पहिल्या फेरीचा निकाल 10 वाजेनंतर

गुरुवारी मतमोजणी : निवडणूक विभागाची तयारी पूर्ण


सकाळी 8 वाजता सुरू होणार प्रक्रिया : 4 मतदारसंघांसाठी सुमारे 5 हजार कर्मचारी

पुणे – लोकसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या गुरुवारी (दि.23) मतमोजणी होणार आहे. पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी कोरेगाव पार्क येथील धान्य गोदाम येथे तर शिरूर आणि मावळसाठी मतमोजणी बालेवाडी येथील संकुल येथे होणार आहे. दरम्यान, चारही लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू होणार असून पहिल्या फेरीचा निकाल दहा वाजता हाती येणार आहे.

मतमोजणीच्या पूर्वतयारीची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ही माहिती दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हा निवडणुक अधिकारी मोनिका सिंग, पोलिस उपायुक्त मितेश गट्टे हे उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी राम म्हणाले, मतमोजणीच्या दिवशी सकाळी 7 वाजता ईव्हीएम ठेवलेली स्ट्रॉगरूम उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडली जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष ईव्हीएमची मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू करणार आहे. त्याचवेळी वेगळ्या टेबलवर टपाली मतदानाची मोजणी करण्यात येणार आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय ईव्हीएम मशीनची मतमोजणी करण्यात येणार आहे. पहिल्या फेरीचा निकाल सुमारे 10 वाजता लागेल. एका फेरीसाठी सुमारे 35 ते 40 मिनिटांचा वेळ लागणार आहे.

मतमोजणीच्या एका टेबलावर एकूण तीन कर्मचारी उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर यावर देखरेख ठेवण्यासाठी एका सूक्ष्म निरिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी चारही मतदारसंघात मिळून एकूण सुमारे चार ते पाच हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे राम यांनी सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×