पहिला निकाल 10 वाजेपर्यंत

पुणे – जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतमोजणी गुरुवारी (दि.24) सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिला निकाल सकाळी 10 वाजेपर्यंत अपेक्षित असून साधारपणे दुपारी 12 वाजण्याच्यादरम्यान सर्व निकाली हाती येतील, असे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मतदान केंद्र आणि उमेदवारांची संख्या पाहता, कसबापेठ विधानसभा मतदारसंघाचा निकाल दहा वाजेपर्यंत लागण्याची शक्‍यता आहे. तर, भोर मतदारसंघात सर्वाधिक मतदान केंद्र असल्याने या ठिकाणी थोडा वेळ लागण्याची शक्‍यता आहे.

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात 246 उमेदवार उतरले आहेत. त्यातील 21 उमेदवारांचे नशीब गुरुवारी उघडणार आहे. पुणे शहरातील कसबा पेठ, वडगावशेरी, पर्वती, हडपसर, पुणे कॅन्टोंन्मेट, कोथरुड, शिवाजीनगर आणि खडकवासला या आठ मतदारसंघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील धान्य गोदाम येथे होणार आहे. तर पिंपरी चिंचवड शहरातील तीन मतदारसंघाची मतमोजणी बालेवाडी येथील क्रीडा संकुल येथे होणार आहे. तर, ग्रामीण भागातील विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी संबधित तालुक्‍याच्या ठिकाणी होणार आहे.

विधानसभा मतदारसंघात किती मतदान केंद्र आहेत. त्यावरून मतमोजणीला किती टेबल आणि किती फेऱ्या ठेवायच्या याची आकडेवारी निश्‍चित होते. मतमोजणीला सकाळी सात वाजता प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे. प्रथम टपाली मतांची मोजणी केली जाणार आहे. टपाली मते मोजणीसाठी स्वंतत्र टेबल ठेवली जाणार आहेत. टपाली मतपत्रिकांची मोजणी झाल्यानंतर सकाळी आठ वाजता इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांवरील (इव्हीएम) मोजणी सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक मतदारसंघात 14 ते 22 टेबल्स ठेवण्यात आली आहेत. या टेबल्सवर एकावेळी एक ईव्हीएमची मोजणी केली जाणार आहे.

कसबा पेठ, शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोंन्मेट विधानसभा मतदारसंघात 14 टेबल असून 20 फेऱ्या होणार आहेत. खडकवासला मतदारसंघात आणि हडपसर विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राची संख्या जास्त असल्याने याठिकाणी 23 फेऱ्या होणार आहेत. वडगावशेरी आणि पर्वतीमध्ये 22 फेऱ्या, कोथरुडमध्ये 21 फेऱ्या होणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.