जिल्हाधिकाऱ्यांकडून जमीन धारकांचा सन्मान
वाघोली – रेल्वेच्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड दुहेरी ब्रॉडगेज लाइनच्या बांधकामासाठी खासगी वाटाघाटीद्वारे भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. याअंतर्गत संपूर्ण प्रकल्पातील पहिले खरेदीखत पेरणे (ता. हवेली) येथे पूर्ण झाले. या प्रकल्पासाठी खरेदीने जमीन दिलेल्या चंद्रकांत गंगाराम कोलते आणि स्मिता चंद्रकांत कोलते यांचा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी या खरेदीखतासाठी पुढाकार घेतलेल्या भूसंपादन क्र. 4 च्या उपजिल्हाधिकारी रोहिणी आखाडे-फडतरे, रेल्वेचे सहमहाव्यवस्थापक (प्रकल्प) सागर अग्रवाल, सहमहाव्यवस्थापक (नियोजन) व्ही. के. गोपाल उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी यावेळी कोलते दाम्पत्याचे अभिनंदन केले.
पुणे व नाशिक जिल्ह्यातील कृषीमाल वाहतूक, माल वाहतूक तसेच प्रवासी वाहतूकीसाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण असून प्रकल्प गतीने मार्गी लावण्यासाठी अशाच प्रकारे शेतकऱ्यांचा पुढाकार आवश्यक आहे. शेतकऱ्यांना जमिनीसाठी योग्य मोबदला मिळत आहे, असा संदेश आजच्या खरेदीखतातून जाणार आहे, असेही डॉ. देशमुख म्हणाले.
हवेली तालुक्यातील 12 गावांचे भूसंपादनाचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यातील 8 गावांची पूर्ण तर 2 गावांची अंशत: संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. प्रकल्पात समावेश असलेल्या तीनही जिल्ह्यातील हे पहिले खरेदीखत आहे. जमिनीसाठी रेडीरेकनरच्या पाचपट दर देण्यात येत असून इमारत तसेच इतर बांधकामे, झाडे आदींसाठी मूल्यांकनाच्या अडीच पट रक्कम दिली जाणार आहे.