वॉशिंग्टन – पहिली विश्वसुंदरी ठरलेल्या किकी हॅकन्सन यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले आहे. कॅलिफोर्निया येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. १९५१ मध्ये किकी हॅकन्सन यांच्या डोक्यावर विश्वसुंदरी या बिरुदाचा मुकुट ठेवण्यात आला होता. जगातल्या पहिल्या विश्वसुंदरीने आज जगाचा निरोप घेतला आहे.
किकी हॅकन्सन यांचा मृत्यू झोपेतच झाला. त्या त्यांच्या कॅलिफोर्निया येथील घरी होत्या. त्यांच्या कुटुंबाने सांगितलं की, किकी हॅकन्सन यांना ४ नोव्हेंबरच्या रात्री झोपेत असतानाच देवाज्ञा झाली. त्यांच्या मृत्यूची घोषणा इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन करण्यात आली आहे.
स्वीडनमध्ये जन्मलेल्या किकी हॅकन्सन यांनी 1951मध्ये लंडनमध्ये झालेल्या पहिल्या मिस वर्ल्ड स्पर्धेत मिस वर्ल्डचा ताज जिंकत इतिहास घडवला. किकी हॅकन्सन यांनी जिंकलेल्या मिस वर्ल्ड या किताबामुळे या पुरस्काराची परंपरा जगात सुरु झाली. मिस वर्ल्ड या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या पोस्टवरुन किकी हॅकन्सन यांना आदरांजली वाहण्यात आली आहे.
आम्ही सगळे किकी हॅकन्सन यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. आमचे प्रेम, सद्भावना हे कायमच किकी हॅकन्सन यांच्या कुटुंबासह असेल अशी पोस्ट या पेजवरुन करण्यात आली आहे. किकी हॅकन्सन यांनी मिस वर्ल्ड हा किताब जिंकण्याआधी मिस स्वीडन हा किताबही जिंकला होता.