मुंबई – शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन्हही गटांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विधान केल्यामुळे अभिनेत्री दीपाली सय्यद या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. याशिवाय शिवसेनेची बाजू मांडण्यासाठी अनेकदा आक्रमक भूमिका घेणाऱ्या नेत्या अशीही दीपाली सय्यद यांची ओळख. मात्र फुटीनंतर सय्यद या शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र आता त्यांनी काढलेल्या रांगोळीची जोरदार चर्चा सुरु आहे.
दीपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्या शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्च्यांना उधाण आले होते. उद्धव ठाकरेंना मधले लोक भेटू देत नाहीत असा रोष देखील त्यांनी व्यक्त केला होता. मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर सय्यद यांनी थेट कमळाची रांगोळी काढत त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
दिवाळीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी दीपाली सय्यद यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात त्यासोबतच दिवाळीचे काही फोटोही शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये त्या कमळाची रांगोळी काढताना दिसत आहेत. यावावरून अनेकांनी त्यांना हे भाजपात जाण्याचे संकेत आहेत का ? असा सवाल देखील कमेंट करत विचारला आहे.