राहुल-प्रियांकाची उद्या पहिली बैठक

लोकसभेच्या तयारीबाबत राज्यांमधील प्रभारींशी करणार चर्चा

नवी दिल्ली : कॉंग्रेस पक्षाच्या सरचिटणीस व पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी विदेश दौऱ्यावरुन मायदेशी परतल्या आहेत. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राहुल गांधी यांनी पक्षाच्या सरचिटणीसांसह राज्यांमधील प्रभारींची 7 फेब्रुवारी रोजी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत सरचिटणीस म्हणून प्रियांका गांधी सहभागी होणार आहेत.

कॉंग्रेस मुख्यालयात प्रियांका गांधींना कक्ष
कॉंग्रेस मुख्यालयात नवनियुक्त सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या नावाची पाटी अखेर लागली आहे. राहुल गांधी उपाध्यक्ष असताना त्यांच्यासाठी जो कक्ष होता तोच प्रियांका गांधी यांना देण्यात आला आहे. त्यामुळे महासचिव असल्या तरी त्या इतर महासचिव यांच्यापेक्षा वेगळ्या आहेत हे स्पष्ट होते. दिल्लीतील 24 अकबर रोड इथे कॉंग्रेसचं मुख्यालय आहे. यात प्रियांका गांधींसाठी कक्ष मिळाला असून बाहेर त्यांच्या नावाची पाटीही लावली आहे. प्रियांका गांधी यांचा कक्ष भाऊ आणि कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अगदी शेजारीच आहे. एवढंच नाही तर प्रियांका यांच्या नावापुढे “वढेरा’ असाही उल्लेख करण्यात आला आहे.

प्रियांका गांधी सोमवारी परदेशातून परतल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांची त्यांच्या तुघलक रोडवरील निवासस्थानी भेट घेतली होती. याप्रसंगी पश्‍चिम उत्तर प्रदेशचे प्रभारी ज्योतिरादित्य शिंदेही उपस्थित होते. सरचिटणीसांच्या बैठकीनंतर राहुल गांधी यांनी सर्व राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांबरोबर 9 फेब्रुवारी रोजी बैठक बोलावली आहे. यात प्रदेश कॉंग्रेसच्या तयारीबाबत चर्चा होईल.

यापूर्वी राहुल गांधी हे बहीण प्रियांका यांच्यासह प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभ मेळ्यात सहभागी होणार असल्याचे बोलले जात होते. काही दिवसांपूर्वी प्रयागराज येथील कुंभ क्षेत्रात प्रियांका यांना गंगाची मुलगी म्हणणारे पोस्टर्स लावण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.