कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; 68 गावातील 15 हजार शेतकऱ्यांचा समावेश

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यातील सुमारे 35 लाख कर्जखात्यांची माहिती प्राप्त झाली आहे. या योजनेतील पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांमधील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची 68 गावांमधील 15 हजार शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली आहे. 

कर्जमाफी योजना राबविताना येणाऱ्या अडचणी त्वरित सोडविण्यात येणार आहेत. कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी एप्रिलअखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. नवीन सरकार आल्यानंतर जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

34 लाख 83 हजार 908 खात्यांची माहिती प्राप्त झाली असून आज जाहीर केलेल्या यादीमध्ये 68 गावातील 15 हजार 368 शेतकऱ्यांची नावे आहेत. 24 तासात त्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा होणार असल्याची माहिती आज देण्यात आली.

योजनेच्या यशाचे श्रेय यंत्रणेला- मुख्यमंत्री

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राज्यातील बळीराजाला कर्जमुक्तीतून चिंतामुक्त करणाऱ्या या मोठ्या योजनेची अंमलबजावणी केवळ ६० दिवसांत झाली. याचे श्रेय यंत्रणेला असल्याचे त्यांनी सांगितले. ही योजना राबविताना आपण शेतकऱ्यांवर काही उपकार करीत आहोत अशी भावना ठेवू नका. शेतकऱ्यांचे आशीर्वाद आपण या माध्यमातून घेत आहोत त्यामुळे आपण लाभार्थी आहोत, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. काही ठिकाणी अंमलबजावणी करताना उणिवा जाणवल्या तर शेतकऱ्यांनी नाराज होऊ नये असे सांगतानाच शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेताना संयम ढळू देऊ नका बळीराजाला दुखावू नका, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यंत्रणेला केली.

कर्जमुक्तीसाठी योजना- उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, बळीराजा कर्जमुक्त व्हावा यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्याच भावनेतून ही योजना सुरू केली. कर्जमुक्त होऊन शेतकऱ्याला पुन्हा काळ्या आईची सेवा करता यावी. शेतीतून चांगले उत्पादन घेता यावे यासाठी राज्य शासनाने ही महत्वाकांक्षी योजना आणली. शेतकरी आनंदात राहावा त्याच्या मुलांचं शिक्षण चांगल्या पद्धतीने व्हावं अशी आमची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

३५ दिवसांमध्ये ३५ लाख कर्ज खात्यांची माहिती गोळा

यावेळी अमरावती येथील सुरेश कोटेकर, सरीता गाढवे, बाबाराव दामोदर यांच्याशीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. योजनेंतर्गत ३४ लाख ८३ हजार ९०८ शेतकरी खात्यांची माहिती प्राप्त झाली आहे. आज १५ हजार ३५८ शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. योजनेंतर्गत ३५ दिवसांमध्ये ३५ लाख कर्ज खात्यांची माहिती गोळा करण्यात आली आहे. तसेच १५ दिवसांच्या आत या माहितीचे लेखापरीक्षण झाले आहे. योजनेची सर्व अंमलबजावणी संगणकीय पद्धतीने होत आहे. शेतकऱ्यांच्या मान्यतेनंतरच कर्जमुक्तीची रक्कम खात्यात जमा होणार आहे. आधार प्रमाणीकरणानंतर शेतकऱ्याला नोंद पावती दिली जात आहे.

विधानभवनात झालेल्या या कार्यक्रमास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, कृषिमंत्री दादाजी भुसे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, माजी मंत्री दिवाकर रावते, मुख्य सचिव अजोय मेहता आदी उपस्थित होते.

यावेळी झालेल्या कार्यक्रमास नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, सहकार विभागाच्या सचिव आभा शुक्ला, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव श्रीनिवास, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव दिलीप पांढरपट्टे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.