कोल्हापूर : देशातील पहिले हिंदकेसरी श्रीपती शंकर खंचनाळे यांचे कोल्हापूर येथे दुःखद निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते अनेक व्याधींनी त्रस्त होते. कोल्हापूरमधील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, अखेर आज सकाळी (सोमवार,14 डिसेंबर) त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. खंचनाळे यांचं राज्यातील अनेक मल्ल घडवण्यात मोठं योगदान आहे. त्यांच्या निधनामुळे कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एकसंबा हे श्रीपती शंकर खंचनाळे यांचे मूळ गाव. 10 डिसेंबर 1934 रोजी खंचनाळे यांचा जन्म झाला. श्रीपती खंचनाळे हे भारताचे पहिले हिंदकेसरी होते. 1959 साली दिल्ली झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत खंचनाळे यांनी पंजाब केसरी बच्चा सिंग याला पराभूत करत हिंदकेसरीची पहिली गदा पटकावली होती.
हिंदकेसरी जिंकत कुस्ती क्षेत्रातील मानाचा पुरस्कार मिळवत महाराष्ट्राची मान त्यांनी उंचावली होती. तसेच त्याच वर्षी कराड येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत तत्कालीन प्रसिध्द मल्ल आनंद शिरगावकर यांना आस्मान दाखवत महाराष्ट्र केसरी किताबही त्यांनी पटकावला होता. पुढे 1965 मध्ये त्यांनी ऑल इंडिया चॅम्पियनशिप स्पर्धाही जिंकली होती.
खंचनाळे यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांनी शोक व्यक्त करत खंचनाळे यांना श्रध्दाजंली वाहिली आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कुस्तीपटू, देशातील पहिले हिंदकेसरी श्री. श्रीपती शंकर खंचनाळे यांचे कोल्हापूर येथे निधन झाल्याचे समजून दुःख झाले. आपले आयुष्य त्यांनी कुस्तीच्या प्रचार व प्रसारासाठी वेचले तसेच अनेक उत्तम मल्ल घडवले. त्यांचे कार्य भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील.
-भगत सिंह कोश्यारी, राज्यपाल
कुस्ती ही महाराष्ट्राची शान व मान आहे.देशातला पहिला हिंदकेसरी किताब पटकावून श्रीपती खंचनाळे यांनी महाराष्ट्राचा व कुस्तीचा गौरव उंचावणारी कामगिरी केली. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील क्रिडा व कुस्तीच्या क्षेत्रातील मार्गदर्शक असे छत्र हरपले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
-उध्दव ठाकरे, मुख्यमंत्री
महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातलं ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व, हिंदकेसरी,महाराष्ट्र केसरी पहेलवान,वस्ताद श्रीपती खंचनाळे यांच्या निधनानं राज्याच्या कुस्ती चळवळीचा आधारस्तंभ,उदयोन्मुख कुस्तीपटूंचे मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
-अजित पवार, उपमुख्यमंत्री
नामवंत पैलवान श्रीपती खंचनाळे यांचे निधन दुःखदायक आहे. १९५९ साली त्यांनी सर्वप्रथम हिंदकेसरी किताबावर आपलं नाव कोरत देशभर लौकिक मिळवला. कोल्हापूरजवळच्या एकसंबा नावाच्या छोट्या गावातून येत त्यांनी राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!-शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार