नवी दिल्ली – सुमारे अडीच वर्षांपुर्वी बंद पडलेली जेट एअरवेज ही कंपनी पुन्हा सुरू होणार आहे. या विमान कंपनीचे व्यवहार आता पुन्हा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असून सन 2022 च्या पहिल्या तिमाहीत देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्याचा कंपनीचा प्रयत्न असणार आहे.
त्यानंतर सहा महिन्यांनी कंपनीची विदेश सेवाही सुरू होणार आहे. येत्या तीन वर्षांत कंपनीच्या ताफ्यामध्ये 50 विमाने दाखल करण्याची योजना असून पुढील पाच वर्षात ही विमान संख्या शंभरावर नेली जाईल अशी माहितीही या विमान कंपनीच्यावतीने देण्यात आली.
प्रचंड तोट्यामुळे ही कंपनी अडीच वर्षांपुर्वी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण आता नव्याने जुळवाजुळव करून ही कंपनी पुन्हा सुरू केली जात आहे. करोनामुळे विमान वाहतुकीला मोठा तोटा सध्या येत आहे. अशा स्थितीत या विमान कंपनीने पुन्हा व्यवसाय सुरू करणे धाडसाचेच होते.