केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल : जेडीयू, अपना दलच्या समावेशाची शक्यता

नवी दिल्ली: पश्चिम बंगालमध्ये झालेला पराभव आणि आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही मंत्र्यांशी वैयक्तिक चर्चा सुरू केली असून त्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला आहे.

भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही मोदींशी चर्चा करणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात जेडीयू आणि अपना दलला प्रतिनिधीत्व देण्यात येणार असल्यांचही सूत्रांनी सांगितलं. विशेष म्हणजे मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यास दुसऱ्या टर्ममधील मोदी सरकारचा हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार असणार आहे.

फेरबदलासाठी एकूण 23 खाते निवडण्यात आले आहेत. या खात्याच्या मंत्र्यांची स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी झाडाझडती घेतली आहे. पंतप्रधानांनी आतापर्यंत धर्मेंद्र प्रधान, नरेंद्र सिंह तोमर, गजेंद्र सिंह शेखावत, महेंद्र नाथ पांडेय, हरदीप पुरी आदी मंत्र्यांशी संवाद साधून त्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला आहे. तसेच इतरही काही मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

या फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. एनडीएत सहभागी झालेल्या मित्र पक्षांना मंत्रिमंडळात घेण्याबाबत ही चर्चा करण्यात आली असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या महिन्याभरातच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

मधल्या काळात दोन केंद्रीय मंत्र्यांचं निधन झालं होतं. शिवाय शिवसेना आणि अकाली दल एनडीएतून बाहेर पडली. तसेच अनेक मंत्र्यांकडे एकापेक्षा अधिक खाती आहेत. त्यामुळे रिक्त पदे भरण्यावर केंद्र सरकारने भर दिल्याचं बोललं जात आहे. या फेरबदलात मोदींच्या मंत्रिमंडळात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जेडीयूला संधी मिळण्याची शक्यता आहे.

अपना दलच्या अध्यक्षा अनुप्रिया पटेल कालच अमित शहांना भेटल्या होत्या. त्यामुळे अपना दललाही राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, काही विद्यमान मंत्र्यांना बढती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.