कारवाईनंतर येरवड्यात तणावाचे वातावरण : पर्यायी रोजगार देण्याची मागणी
पुणे – शहर डुक्करमुक्त करण्यासाठी महापालिकेने कर्नाटकातून ठेकेदार आणत पोलीस बंदोबस्तात मंगळवारी कारवाई सुरू केली. मात्र, डुक्कर मालकांनी पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांना जोरदार विरोध केल्याने महापालिकेस पहिल्याच दिवशी ही कारवाई गुंडाळावी लागली. दरम्यान, पकडलेली ही सर्व डुकरे गाडीसह विश्रांतवाडी पोलीस ठाण्याबाहेर पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आली.
महापालिकेने गेल्या वर्षभरापासून डुक्करमुक्त पुण्याची मोहीम हाती घेतली आहे. मात्र, कारवाई सुरू होताच डुक्करमालक आक्रमक होत असल्याने प्रत्येकवेळी भीतीपोटी ही कारवाई थांबवण्यात आली आहे. मात्र, दोन महिन्यांपूर्वी काहीही करून डुकरे शहराबाहेर काढण्याचा चंग पालिकेने बांधत यासाठी थेट कर्नाटकातून ठेकेदार बोलवला. त्यानुसार हा ठेकेदार सर्व यंत्रणेसह दाखल झाला. त्या अनुषंगाने महापालिकेने जाहीर निवेदन देत “मालकांनी त्यांची डुकरे शहराबाहेर न हलवल्यास ती कायदेशीरपणे महापालिकेची मालमत्ता होतील,’ असा पवित्रा घेतला. त्यानंतर पालिकेने पोलीस बंदोबस्ताची मागणी केली. मात्र, पोलिसांकडून त्यास नकार दिला जात होता. त्यातच, आरोग्य विभागाकडून सक्षमपणे कारवाई होत नसल्याने आयुक्तांनी आरोग्य विभागाची ही जबाबदारी अतिक्रमण विभागावर सोपविली होती.
अतिक्रमण विभागानेही गोपनीय बंदोबस्ताची मागणी करत ही कारवाई करण्याचे नियोजन केले. त्यानुसार डुक्कर पकडण्यासाठी मंगळवारी सकाळी ठेकेदाराचे 40 ते 50 कर्मचारी आधी विश्रांतवाडी येथे कारवाई करून नंतर प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरात आले.
यावेळी डुक्कर मालकांनी “आमच्याकडे डुकरांशिवाय उत्पन्नाचे साधन काहीच नाही. त्यामुळे आधी उत्पन्नाचे साधन द्या आणि कारवाई करा’ अशी भूमिका घेत कारवाईस विरोध केला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर हा वाद वाढतच असल्याने अखेर महापालिका आणि पोलिसांनी एक पाऊल मागे घेत कारवाई थांबविण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत सुमारे 27 डुकरे पकडण्यात आली होती.