उत्तर प्रदेशात लव्ह जिहाद प्रकरणी पहिली अटक

नवी दिल्ली : देशात उत्तर प्रदेश मध्ये लव्ह जिहाद विरोधात नवीन अध्यादेश लागू करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील राज्यातील पहिली अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. तीन दिवसांपूर्वी बरेलीमध्ये या अध्यादेशातंर्गत पहिला एफआयआर नोंदवण्यात आला. या प्रकरणात आरोपी ओवैस अहमदला बुधवारी अटक करण्यात आली.

हिंदू मुलीला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी जबरदस्ती केल्याचा तसेच मुलीच्या पालकांनी धर्मांतरावर आक्षेप घेतल्यानंतर त्यांना धमकावल्याचा ओवैस अहमदवर आरोप आहे. आरोपी ओवैस अहमद मागच्या काही दिवसांपासून फरार होता. त्याच्या विरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर २८ नोव्हेंबरपासून पोलीस त्याच्या मागावर होते. दरम्यान, त्याच्याविरोधात नव्या अध्यादेशानुसार एफआयआर नोंदवण्यात आला. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे.

ओवैसचे एका हिंदू मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. मागच्यावर्षी ते पळून गेले. ओवैसला त्यावेळी अटक झाली होती. मुलीच्या वडिलानी त्याच्यावर अपहरणाचा आरोप केला होता. पण मुलीने तो आरोप फेटाळून लावला. एप्रिल महिन्यात मुलीच्या कुटुंबीयांनी तिचे दुसरीकडे लग्न लावून दिले. या प्रकरणात मुलीच्या वडिलांनी रविवारी एफआयआर नोंदवला. ओवैस दबाव टाकून आपल्या मुलीचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत होता. तो आमच्या कुटुंबाला सुद्धा धमकावत होता असा आरोप मुलीच्या वडिलांनी केली आहे.

“मुलीचे लग्न झाल्याचे समजल्यापासून ओवैस मुलीच्या कुटुंबीयांना त्रास देत आहे. मुलीला परत बोलवा. मुलीने धर्मांतर केल्यानंतर दोघांचे लग्न लावून देण्यासाठी कुटुंबीयांवर दबाव टाकत आहे” असे या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. शनिवारी तो मुलीच्या घरी गेला होता. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार नोंदवली असे एसएचओ दया शंकर यांनी सांगितले. लव्ह जिहाद विरोधी बनवलेल्या नव्या कायद्यातंर्गत १० वर्ष तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.