मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोसच्या दौऱ्यावर आहेत. येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून महाराष्ट्रासाठी पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी करण्यात आला आहे. कल्याणी समूहाकडून गडचिरोली येथे पोलाद उद्योगासाठी 5200 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. यासाठी कल्याण समूहाने महाराष्ट्र शासनासोबत सामंजस्य करार केला आहे.
महाराष्ट्र राज्य शासन आणि कल्याणी समुहामध्ये स्टील आणि संरक्षण क्षेत्रात करार करण्यात आला आहे. यात गडचिरोली येथे पोलाद उद्योगासाठी 5 हजार 200 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. यात 4 हजार रोजगार निर्मिती देखील होणार आहे. दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये कल्याणी समूहाचे प्रमुख अमित कल्याणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत हा महत्त्वाचा करार केला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ल्ड वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक अध्यक्ष क्लॉस श्वाब यांची भेट घेतली. हरित ऊर्जा, इलेक्ट्रिकल वाहन, उद्योग जगतातील अनेक नवीन घडामोडींवर दोघांमध्ये चर्चा झाली. तसेच महाराष्ट्राच्या विकासासाठी क्लॉस श्वाब यांनी शुभेच्छा देखहील यावेळी दिल्या.
सध्या दावोसमध्ये आता महाराष्ट्र पॅव्हेलियन सज्ज झाले आहे. पुढील दोन दिवस अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यात महाराष्ट्रासाठी विक्रमी सामंजस्य करार होणार असून विविध कंपन्यांसोबत बैठकही होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी होरॅसिसचे अध्यक्ष फ्रँक जर्गन रिक्टर यांचीही भेट घेतली. फ्रँक हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे माजी संचालक आहेत.
होरॅसिसचे मुंबईत मुख्यालय –
येणार्या काळात मुंबईत जागतिक कंपन्यांची एक परिषद आयोजित करण्यासाठी फ्रँक जर्गन रिक्टर यावेळी पुढाकार दर्शविला. नवीन तंत्रज्ञान, नाविन्य यावर भर देताना असे आयोजन राज्य सरकारसोबत सहकार्याने करण्याबाबत तसेच होरॅसिसचे मुंबईत मुख्यालय असण्याबाबत सुद्धा यावेळी प्राथमिक चर्चा झाली.