पारनेर -पारनेर तालुक्यातील म्हसोबा झाप येथील 25 वर्षीय शासकीय ठेकेदार इंजि. स्वप्निल जयसिंग आग्रे यांच्यावर मंगळवारी दुपारी अडीच्या सुमारास तीन अज्ञात हल्लेखोरांनी पिस्तूलातून दोन गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात आग्रे यांच्या छातीच्या उजव्या बाजूला दोन गोळ्या लागल्या असून ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हल्लेखोर परप्रांतीय असून आर्थिक देवाण- घेवाणीतून हा हल्ला झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. गेल्या दोन वर्षापासून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक शासकीय कामे त्यांनी घेतली होती. त्यामुळे आर्थिक देवाण -घेवाणीतून हा हल्ला झाला आहे का या दृष्टीने सुद्धा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हल्ला करून हे तिघेजण फरार होण्याच्या बेतात असताना या तिघांपैकी दोन जणांना वारणवाडी सबस्टेशनजवळ पिस्तूलसह वारणवाडी ग्रामस्थांनी पकडुन पारनेर पोलिसांच्या हवाली केले. एक जण फरार झाला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी 2.30 वाजता घडली.
स्वप्निल आग्रे हा शासकीय ठेकेदार आपल्या चारचाकीमधून आपल्या घरी चालले असताना दुचाकीवरून आपली तोंडे बांधून आलेल्या तिघांनी त्यांच्यावर तीन राऊंड फायर केले. त्यापैकी दोन गोळ्या छातीच्या उजव्या बाजूला लागल्या असून हल्ला करून ते हल्लेखोर दुचाकीवरून फरार झाले. हे हल्लेखोर परप्रांतीय असून आर्थिक व्यवहारातूनच हल्ला झाला असण्याची शक्यता आता व्यक्त होऊ लागली आहे.
पारनेर तालुक्यातील मांड ओहोळ- म्हसोबा झाप रस्त्यावर स्वप्निल आग्रे (वय 25, रा. म्हसोबा झाप) या तरुण शासकीय ठेकेदार म्हसोबा झापकडे चालवले असताना तीन जणांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले. गोळीबार झाल्यानंतर त्याला टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, परंतु गोळीबारात गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.