जामियानंतर शाहीनबागमध्ये गोळीबार

नवी दिल्ली : दिल्लीमधील जामियानंतर शाहीबनाग येथे आज गोळीबार करण्याचा प्रकार घडला. एका व्यक्तीने हवेत दोन वेळा गोळीबार केला असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्याला तातडीने ताब्यात घेतले. पोलीस ताब्यात घेऊन जात असताना “या देशात फक्त हिंदूंची चालणार इतर कोणाची नाही’ अशी घोषणा तरुण देत होता.

कपील गुज्जर असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. सुधारित नागरिकत्व विधेयकाविरोधात शाहीनबागमध्ये आंदोलन सुरु असून तिथे गोळीबार झाल्याचा आवाज ऐकू आला आहे. यावेळी “हिंदु राष्ट्र जिंदाबाद’ अशी घोषण देत त्याने हवेत दोन वेळा गोळीबार केला.

या ठिकाणी आंदोलन सुरु असल्याने बॅरिकेट्‌स उभारण्यात आले असून तिथेच हा गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे. या गोळीबारात कोणीही जखमी झाल्याची घटना घडली नाही. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्याला ताब्यात घेतले आहे. हा तरुण उत्तर प्रदेशातील दल्लूपुरा येथील रहिवासी असल्याचे समजते.
दिल्लीचे डीसीपी चिन्मय बिस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाने हवेत गोळीबार केला होता.

यानंतर पोलिसांनी तत्काळ त्याला पकडले आणि ताब्यात घेतले. तरुणाला सरिता विहार पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून पुढील चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती दिली. नागरिकत्व दुरुस्ती आणि नागरिकत्व नोंदणी विरोधातील आंदोलनामुळे गेल्या काही दिवसांपासून शाहीनबाग चर्चेत आहे. तसेच हा परिसर दिल्ली विधानसभा निवडणुकीतील मुद्दा बनू लागला आहे. शाहीन बागेतील आंदोलकांवरून राजकीय पक्षांमध्ये शाब्दिक चकमक सुरु आहे.
दरम्यान, जामियामध्ये तरुणाने गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच हा गोळीबार झाला आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.