ह्युस्टन: अमेरिकेत कन्सास प्रांतात दोन बंदुकधाऱ्यांनी एका बार मध्ये घुसून केलेल्या अंदाधुंद गोळीबारात किमान चार जण ठार झाले तर अन्य पाच जण जखमी झाले आहेत. रविवारी कन्सास शहराच्या तकिल केसी बार मध्ये हा प्रकार घडला. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमाराला झालेल्या या प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
या गोळीबाराच्या घटनेविषयी पोलिसांना अनेक अँगलने चौकशी सुरू केली आहे. तथापी वांशिक विद्वेषातून हा प्रकार झाल्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली आहे. या आधी घडलेल्या अशाच एका गोळीबाराची प्रतिक्रीया म्हणून हा प्रकार झाला असावा असा कयास आहे. ज्या तकिला केसी बार मध्ये ही घटना घडली तो बार खासगी आहे. त्यामुळे मेंबरशिपशिवाय येथे कोणालाही प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे लगेच हे हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात आले नसले तरी त्यांना शोधणे अवघड नाही असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.