-जखमी तरुण रुग्णालयात दाखल; जुन्या भांडणाचे कारण
-घटनास्थळी पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली भेट
वाई – येथील एमआयडीसीतील चांदणी चौकात रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास जुन्या भांडणातून एकावर गोळीबार झाल्याची घटना घडली. या गोळीबाराच्या घटनेत जखमी झालेल्या युवकास तात्काळ वाई येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच वाई पोलीस घटनास्थळी पोहचले तसेच पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी ही घटनास्थळी भेट दिली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की गेल्या काही महिन्यांपूर्वी वाई एमआयडीसी येथील चांदणी चौकात युवकांच्या दोन गटात हाणामारी झाली होती, त्याप्रकरणी वाई पोलिसात गुन्हेही दाखल झाले होते. त्याच गुन्ह्यातील संशयित असलेल्या एकावर रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला. ही बातमी वाऱ्यासारखी वाई शहरात पसरली. या घटनेची माहिती मिळताच वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्यासह पथक घटनास्थळी पोहचले. सातारा येथून पोलीस अधीक्षक समीर शेख यांनीही घटनास्थळी भेट दिली. स्थानिक गुन्हे शाखाही घटनास्थळी पोहचली. तसेच जखमी युवकास खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून घटनास्थळी पोलीस फायरिंग झालेल्या ठिकाणी काही धागेदोरे हाती मिळतात का तसेच गोळीबार कोणी केला याचा शोध घेत आहेत.