दिवाळीआधीच फुटणार विजयाचे फटाके

लोकसभा पोटनिवडणूक चर्चेची; आठ विधानसभा मतदारसंघांतील निकालाबाबत तर्कवितर्क

जिल्ह्यात सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसह सातारा, वाई, कोरेगाव, फलटण, माण, कराड दक्षिण, कराड उत्तर व पाटण या आठ विधानसभा मतदारसंघांत सोमवारी मतदान झाले. दिग्गजांसह लोकसभेसाठी सहा व विधानसभेसाठी 73 उमेदवारांसाठी झालेले मतदान मशीनबंद झाले. जिल्ह्यातील काही मतदान केंद्रांवर सायंकाळी उशीरापर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती. घनघोर प्रचारांनंतर मतदारांनी उमेदवारांचे भवितव्य ठरविले आहे.

भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसने लोकसभा पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे सहा विधानसभा मतदारसंघ प्रचाराने ढवळून निघाले. भाजपचे उदयनराजे भोसले व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या श्रीनिवास पाटील यांच्या तुल्यबळ लढतीमुळे या निकालाची राज्यात उत्सुकता आहे. विधानसभा निवडणुकीतील जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांत पारंपारिक लढती झाल्या. गेल्या काही निवडणुकांत जे उमेदवार रिंगणात होते, एखादा नवख्याचा अपवाद वगळता तेच उमेदवार यावेळीही आपले पक्षाचे लेबल बदलून आपली ताकद आजमावित असल्यामुळे पक्ष बदलल्यामुळे विजय होणार की व्यक्तीच्या ताकदीने, याबाबतचे अंदाज बांधले जात आहेत.

सातारा मतदारसंघात शिवेंद्रसिंहराजे भोसले (भाजप) व दीपक पवार (राष्ट्रवादी कॉंग्रेस) यांच्यातच प्रमुख लढत झाली. प्रचारामध्ये सातारा शहर आणि जावळी तालुक्‍यातील मतदानावर अधिक लक्ष केंद्रित करण्यावर दोघांनीही भर दिला होता. कोरेगाव मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मातब्बर नेते शशिकांत शिंदे यांनी हॅटट्रिक करण्यासाठी प्रचारत जोर लावला होता. शिवसेनेच्या महेश शिंदे यांनी त्यांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत.

वाई मतदारसंघात दोन घरांतील पारंपरिक लढतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विद्यमान आमदार मकरंद पाटील आणि भाजपकडून माजी आमदार व किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांच्यातच जुगलबंदी रंगली. फलटण मतदारसंघात दीपक चव्हाण (राष्ट्रवादी कॉंग्रेस) हॅटट्रिक करण्यासाठी उत्सुक आहेत. दिगंबर आगवणे भाजपकडून मैदानात आहेत. या मतदारसंघातील किंगमेकर विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व त्यांचे विरोधक खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर अर्थातच राजे गट विरोधात विरोधी गट अशी लढत रंगली होती.

कराड उत्तर मतदारसंघात बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस), धैर्यशील कदम (शिवसेना) व बंडखोर अपक्ष मनोज घोरपडे रिंगणात आहेत. ही तिरंगी लढत कुणाला कौल देणार, याची उत्सुकता जिल्ह्यात आहे. पाटण मतदारसंघात देसाई व पाटणकर यांच्यातील पारंपरिक लढतीत आरोप- प्रत्यारोपांच्या पारंपरिक फैरी झडल्या. शंभूराज देसाई (शिवसेना) आणि सत्यजितसिंह पाटणकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस) यांच्या या संघर्षांत कोणीही बाजी मारली तरी तेथील राजकीय रणांगण कायमस्वरूपी तापलेलेच राहणार आहे.

माण-खटावमध्ये तिसऱ्याचा लाभ?
माण मतदारसंघ यावेळी मोठा चुरशीचा ठरला आहे. गेल्यावेळप्रमाणेच जयकुमार गोरे व शेखर गोरे यांच्यातील लढत रंगताना अपक्ष प्रभाकर देशमुखानी चुरस निर्माण केली. जयकुमार यावेळी भाजपकडून तर शेखर शिवसेनेकडून रिंगणात आहेत. राज्यात युती असली तरी माणमध्येही मैत्रीपूर्ण लढत लक्षवेधी ठरली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इथे सभा घेतल्या. त्याशिवाय “आमचं ठरलयं’ या सर्वपक्षीय आघाडीतून माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख रिंगणात होते. दुष्काळ, पाणीप्रश्‍नासह मतदारसंघाच्या विकासाच्या मुद्‌द्‌यांपेक्षा एकमेकांवरील खालच्या भाषेतील आरोप-प्रत्यारोपांनीच माणमधील लढत रंगली. आता दोन भावांच्या संघर्षात तिसऱ्याचा लाभ होणार का, याची जिल्ह्यात चर्चा आहे.

दक्षिणची प्रतिष्ठा कुणाच्या बाजूने?
कराड दक्षिण मतदारसंघ भाजप आणि कॉंग्रेस दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेचा आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (कॉंग्रेस), भाजपचे डॉ. अतुल भोसले व अपक्ष उदयसिंह पाटील उंडाळकर अशी तिरंगी लढत झाली आहे. चव्हाण व भोसले यांच्याप्रमाणेच विलासराव पाटील उंडाळकर यांचेही मतदारसंघात वर्चस्व आहे. उंडाळकरांचे चिरंजीव उदयसिंह पाटील रिंगणातअसल्याने मतविभागणी परिणामकारक ठरणार आहे. तिघांनीही जोरदार प्रचार केल्यामुळे भाजप विरूद्ध कॉंग्रेस अशा या प्रतिष्ठेच्या लढतीत काय होणार, याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.