पुणे – फटाके विक्रेत्यांना मागील वर्षीच्याच जागांवर स्टॉलला परवानगी देण्यात येणार आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात किंवा गजबजलेल्या भागात कोणालाही परवानगी मिळणार नाही, असे महापालिका प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
दिवाळीसाठी दसऱ्यापासूनच शहरात फटाके विक्रीचे स्टॉल लावायला सुरुवात होते. म्हात्रे पुलालगतच्या डीपी रस्त्यावर फटाके विक्रीचे मोठे स्टॉल लागत होते. याशिवाय नदीपात्रातही अनेक स्टॉल लावले जात होते. मात्र, मागील वर्षीपासून या ठिकाणच्या परवानगी बंद करण्यात आली.
म्हात्रे पुलाजवळही काही वर्षांपासून परवानगी बंद करण्यात आली आहे. याठिकाणी पुन्हा परवानगी द्यावी, अशी मागणी करत फटाका विक्रेता संघाने महापालिकेकडे पाठपुरावा सुरू केला आहे. मात्र, मागील वर्षी जे धोरण ठरवले होते तेच याही वर्षी लागू करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ. शांतनू गोयल यांनी सांगितले.
गर्दीच्या ठिकाणी, रहिवासी भागात आणि रस्त्यांवर फटाका स्टॉल उभारण्याला मागीलवर्षीपासून महापालिका प्रशासनाने मनाई केलेली आहे.