आगबाधित अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत

पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाचा बाधितांकडे कानाडोळा

कात्रज – प्रभाग क्रमांक 38 येथील अप्पर इंदिरानगर डेपोच्या मागील बाजूस असलेल्या अण्णा भाऊ साठेनगर येथील 6 पत्र्यांच्या घरांना दोन दिवसांपूर्वी आग लागण्याची घटना घडली होती. यामध्ये कोणालाही गंभीर इजा झाली नव्हती. मात्र, 6 ते 7 घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. मात्र, घटनेला 3 दिवस होऊनदेखील अद्यापही पुणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून कोणतीही मदत बाधित कुटुंबांना मिळालेली नाही. त्यामुळे सर्वत्र नाराजीचा सूर आहे.

आग लागली त्यावेळी ती विझविण्याचा प्रयत्न परिसरातील नागरिक व तरुण वर्गाने केला. मात्र, तोपर्यंत आगीने रुद्र रूप धारण केले होते. त्यानंतर अग्निशमन दलाची गाडी आल्यानंतर ती आटोक्‍यात आली. मात्र, तोपर्यंत मजूर कुटुंबांचे संसार उपयोगी साहित्य जळून गेले होते. याचशिवाय, या घटनेनंतर बाधित कुटुंबांना निवाऱ्यासाठी थंडीमध्ये गुजराण करावी लागली होती. या आधिदेखील 25 सप्टेंबरला मुसळधार पावसामुळे आलेल्या ओढ्याच्या पुरामुळे मोठे नुकसान झाले होते.

त्यावेळीही मनपाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग तेथे कोठेही दिसून आला नव्हता. त्यामुळे हा विभाग फक्‍त नावालाच उरला असल्याचे दुर्घटनेमध्ये बाधित नागरिकांकडून बोलले जात आहे. घटनेनंतर प्रभाग क्रमांक 38 येथील नगरसेवक दत्तात्रय धनकवडे यांनी घटनास्थळाला भेट दिली होती. तसेच, त्यानंतर तहसीलदार कोलते यांनी तलाठी यांच्यामार्फत पंचनामेदेखील केले होते. मात्र, पालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत जी मदत येणे गरजेचे होते. ती अद्यापपर्यंत मिळालेली नाही. घटनेनंतर पुणे महानगरपालिकेचे उपायुक्‍त ज्ञानेश्‍वर मोळक, कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्‍त रवींद्र घोरपडे व संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. याबाबत अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

मनपाच्या आपत्कालीन व्यवस्था विभागाकडून यापूर्वी पुरामुळे भिंत पडली होती त्यावेळेसदेखील मदत मिळाली नव्हती. तसेच, काही दिवसापूर्वी लागलेल्या आगीच्या घटनेवेळी नागरिकांना विभाग मदतीसाठी येईल अशी अपेक्षा होती. मात्र, तसे काहीही घडले नाही. तसेच, घटनेनंतर बाधिताना मदतही जाहीर केलेली नाही. त्यामुळेही ही आपत्कालीन व्यवस्थापन नसून सुस्त व्यवस्थापन आहे.
– दत्तात्रय धनकवडे, नगरसेवक

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.