पिंपरी (प्रतिनिधी) – किराणा दुकानात गॅस रिफिलिंग करत असताना आग लागली. ही घटना चिखली येथे गुरूवारी (दि. ३) सायंकाळी घडली. अग्निशामक दलाने घटनास्थळावरून लहान मोठे एकूण २२ सिलिंडर जप्त केले.
चिखलीतील साने चौकाजवळ ललित चौधरी यांचे चौधरी जनरल स्टोअर्स नावाचे किराणा मालाचे दुकान आहे. या दुकानात चौधरी हे मोठ्या गॅस सिलिंडरमधून छोट्या गॅस सिलिंडरमध्ये रिफिलिंग करून देत असे. गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास गॅस रिफिलिंगचे काम सुरू असताना अचानक गॅसने पेट घेतला. प्रसंगावधान राखत दुकानातील नागरिकांनी पेटलेला गॅस दुकानातून बाहेर आणला. गॅस सिलिंडरने पेट घेतल्याची माहिती अग्निशामक दलास मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत नागरिकांनी पेटलेला गॅस विझवला.
अग्निशामक दलाने घटनास्थळावरून पाच मोठे तर १७ छोटे गॅस सिलिंडर जप्त केले. त्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देऊन जप्त केलेले गॅस सिलिंडर चिखली पोलिसांच्या ताब्यात दिले. चिखली पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.