पीएमपी बसेसचे सेफ्टी ऑडिट रखडले

आवाक्‍याबाहेर खर्च असल्याने काम थांबवले, नव्याने निविदा प्रक्रिया राबविणार

– गणेश राख

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – गेल्या काही दिवसांत पीएमपी बसेस आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याने या पार्श्‍वभूमीवर बसेसचे फायर सेफ्टी ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी निविदा प्रक्रिया राबवून एका खासगी संस्थेला ऑडिटचे काम देण्यात आले होते. मात्र, ऑडिटसाठी एकच संस्था पुढे आल्याने प्रायोगिक तत्त्वावर हे काम देण्यात आले होते. यानुसार संस्थेने पिंपरी डेपोतील जवळपास 50 बसेसचे ऑडिटही पूर्ण केले. मात्र, ऑडिटसाठी कंपनीकडून आकारण्यात येणारी अवाजवी रक्‍कम आणि ताफ्यातील एकूण बसेसची संख्या पाहता प्रशासनाला हे परवडणारे नसल्याने प्रशासनाकडून सुरू असलेले काम थांबविले आहे. यामुळे पीएमपी बसेसचे सेफ्टी ऑडिट पुन्हा एकदा रखडले असून यासाठी आता नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी लागणार आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसेसला गेल्या काही महिन्यांत मार्गावर तसेच डेपोमध्ये आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या. या पार्श्‍वभूमीवर पीएमपी बसचे फायर सेफ्टी ऑडिट झाले आहे का, असा प्रश्‍न विचारला जाऊ लागला. यामुळे बसेस पेटण्याचे नेमके कारण काय यासंदर्भात निर्णयासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. समितीने यावर अभ्यास करुन पीएमपीच्या ताफ्यातील सर्व बसेसचे सेफ्टी ऑडिट करून घेण्याचे सांगितले होते. त्यानुसार महापालिकेने ते करुन द्यावे, अशी मागणी पीएमपीने केली. मात्र, मनुष्यबळाअभावी महापालिकेच्या अग्निशमन विभागाला ऑडिट करणे शक्‍य नसल्याने पालिकेने पीएमपीला काही खासगी संस्थांची नावे सुचवली होती. त्यानुसार यामधील क्राफ्ट या संस्थेने पुढाकार घेत पीएमपी अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालिक नयना गुंडे यांच्यासमोर कशा प्रकारे फायर ऑडिट केले जाईल, याचे प्रात्यक्षिक करुन दाखविले होते. मात्र, एकच कंपनी असल्याने गुंडे यांनी या संस्थेला प्रायोगिक तत्त्वावर पिंपरी डेपोतील बसेसचे काम दिले होते. संस्थेकडून करण्यात येणारे काम, ऑडिटसाठी येणारा खर्च पाहून पुढे या कंपनीला काम द्यायचे की नाही हे ठरणार होते. त्यानुसार संस्थेने डेपोतील जवळपास 50 बसेसचे ऑडिटही केले. मात्र, संस्थेकडून प्रतिबस ऑडिटसाठी येणारा खर्च जास्त असून पीएमपीच्या ताफ्यातील एकूण बस पाहता हा खर्च अवाक्‍याबाहेर जात आहे. यामुळे प्रशासनाकडून ऑडिटचे काम थांबवण्यात आले आहे. मात्र, यामुळे आता पीएमपीच्या ताफ्यातील बसेसचे सेफ्टी ऑडिट रखडले आहे.

महापालिकेकडून काही खासगी संस्थांची यादी देण्यात आली होती. यातील क्राफ्ट कंपनीने पुढे येत कशाप्रकारे ऑडिट केले जाईल याचे प्रात्यक्षिक करुन दाखवले होते. यानुसार या संस्थेला प्रायोगिक तत्त्वावर सेफ्टी ऑडिटचे काम देण्यात आले होते. मात्र, संस्थेकडून ज्या पद्धतीने काम केले जात आहे. त्यानुसार येणारा खर्च मोठा असून न परवडणारा आहे. यामुळे सध्यातरी हे काम थांबवण्यात आले आहे. मात्र, यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात येऊन पुढील काही दिवसात काम पूर्ण केले जाईल.
– नयना गुंडे, व्यवस्थापकिय संचालिक, पीएमपीएमएल.

सेफ्टी ऑडिट महत्वाचे का?

पीएमपी ही पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा मुख्य कणा आहे. पीएमपी बसने दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सुमारे 11 लाख आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पीएमपीची बसेसची संख्या कमी आहे. यातच गेल्या काही महिन्यांमध्ये पीएमपी बसेसला मार्गावर आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. गेल्या आठ महिन्यात जवळपास नऊ पीएमपी बसेसनी पेट घेतला होता. काही दिवसांपूर्वी विमानगर येथे पीएमपीच्या चालू मार्गावरील एका गाडीला अचानक मोठी आग लागली होती. यामुळे पीएमपी गाड्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. या पार्श्‍वभूमीवर पीएमपीचे सेफ्टी ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)