शाळांचे अग्निरोधक लेखापरीक्षण करा

पुणे – सुरत येथील खासगी शिकवणी वर्गाच्या इमारतीच्या लागलेल्या आगीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आणि खासगी संस्थांच्या शाळांचे स्थापत्य, वीज आणि अग्निरोधक यंत्रणेचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी यांनी दिले आहेत. याबाबत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संचालकांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिले आहेत.

मंगळवारी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. त्यात विविध विषयांवर चर्चा झाली. त्यात शाळांच्या स्थापत्य, वीज आणि अग्निरोधक यंत्रणेच्या लेखापरीक्षणाचा मुद्दाही उपस्थित झाला. काही दिवसांपूर्वी सुरत येथे खासगी शिकवणी वर्गाच्या इमारतीला लागलेल्या आगीत काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर राज्यातील शाळा, खासगी शिकवणी वर्गांच्या सुरक्षिततेचाही मुद्दा पुढे आला आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यामुळे शिक्षण आयुक्तांनी या संदर्भात कार्यवाही करण्याची सूचना दिली आहे. राज्यातील शाळांची संख्या हजारांच्या घरात असल्याने या प्रक्रियेला वेळ लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे. सर्व जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व शिक्षा अभियान आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता यांच्याशी समन्वय साधून राज्यभरातील शाळांच्या वीज, स्थापत्य आणि अग्निरोधक यंत्रणेचे लेखापरीक्षण करण्यास सांगण्यात आले आहे. त्याची जबाबदारी प्राथमिक आणि माध्यमिकच्या शिक्षण संचालकांवर सोपवण्यात आली आहे. उपलब्ध मनुष्यबळ, त्यासाठी येणारा खर्च यांचा ताळमेळ घालून तातडीने हे काम पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वोच्च प्राधान्य असेल, असे सोळंकी यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.