Pune MIDC Fire | आधी दैवाचा घाला नंतर लाल फितीचा

डीएनए चाचणीसाठी नातेवाईक दिवसभर ससूनमध्ये ताटकळत

पुणे -पिरंगुट औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपनीत सोमवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत 17 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये 15 महिलांचा समावेश आहे. कामगारांचे मृतदेह पूर्णपणे जळाले असल्याने त्यांची ओळख पटविणे अवघड झाले आहे. त्यामुळे ग्रामीण पोलिसांकडून मृतदेहांची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

डीएनए चाचणीसाठी ससून रुग्णालयात मृतांच्या नातेवाइकांना बोलावण्यात आले होते. मृतांचे नातेवाईक सकाळी सात वाजल्यापासून नमूने देण्यासाठी हजर होते. मात्र सायंकाळी सहापर्यंत फक्‍त कागदपत्रांचे सोपस्करच सुरू होते. यामुळे नातेवाइकांचे डीएनएसाठी नमुने घेण्यात आले नव्हते. अगोदरच दु:खात असलेले नातेवाईक यामुळे संतप्त झाले होते.

भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या नातेवाइकांच्या रक्‍ताचे नमुने (ब्लड सॅम्पल) सायंकाळी उशिरा घेण्यात आले. डीएनए चाचणी तसेच रक्‍तांच्या नमुन्याद्वारे मृतांची ओळख पटविण्यात येणार असल्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.

मृतांची लवकरात लवकर ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. पुण्यातील पाषाण रस्त्यावर असलेल्या न्यायवैद्याकीय प्रयोगशाळेसह नाशिक, औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत डीएनए चाचणी करण्यासाठी नमुने पाठविण्यात येणार आहेत. घटनास्थळी एका मृतदेहाचा अवशेष सापडला आहे, असे देशमुख यांनी नमूद केले. दरम्यान, पौड पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतांच्या नातेवाइकांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. पोलीस ठाण्याच्या परिसरातील वातावरण शोकाकुल झाले होते.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.