सातारा – येथील देगाव फाटा (ता. सातारा) येथील गादी सेंटरला बुधवारी लागलेल्या आगीत सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडल्याचे सांगितले जात असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, देगाव फाटा येथील भंडारी हाईट्स या इमारतीमध्ये अरुण यादव यांच्या मालकीचे गादी सेंटरचे दुकान आहे. बुधवारी सकाळी या दुकानात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ही घटना समजताच शेजारचे दुकानदार व स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती सातारा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला दिली.
अग्निशामक दलाची गाडी येईपर्यंत दुकानदार व स्थानिक नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अग्निशामक दल, पोलिस व वाहतूक शाखेचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
या घटनेमध्ये गादी सेंटरचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने यात कसलीही जीवित हानी झाली नाही. अग्निशामक दलाने साधारण एक तास शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली.