परिसरामध्ये घबराट : सुदैवाने कोणतीही मोठी हानी नाही
शिक्रापूर – येथील औद्योगिक वसाहतीतील नावाजलेल्या व मोठ्या अशा एंकाई कास्टलाय कंपनीला रविवारी दुपारच्या सुमारास आग लागली. यावेळी आगीचा धूर सुमारे तीन ते चार किलोमीटरपर्यंत दिसून येत होता; परंतु वेळीच आग आटोक्यात आणल्याने कोणत्याही प्रकारची मोठी हानी झाली नाही.
शिक्रापूर येथे पुणे नगर महामार्गावर असलेल्या औद्योगिक वसाहतीतील नावाजलेल्या अशा एंकाई कास्टलाय या कास्टिंग वस्तू बनविण्याच्या कंपनीतील धुराड्यातून दुपारच्या सुमारास मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ दिसून येऊ लागले आणि परीसरात कंपनीला आग लागल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली, घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, पोलीस उपनिरीक्षक किरण भालेकर, राजेश माळी, पोलीस कॉन्सटेबल निखील रावडे, अंकुश चौधरी यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील एक आणि पुणे महानगर पालिकेचा एक असे दोन अग्निशामक बंब बोलाविण्यात आले. तर यावेळी एंकाई कास्टलाय व एलिकॉन कास्टलाय या दोन कंपन्यांमध्ये असलेल्या अग्निशमक यंत्रांच्या सहाय्याने सदर आग विजाविण्यात आली, तर घटनेची माहिती मिळताच परिसरातील अनेक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी केली होती.
यावेळी सदर कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात गॅसचा साठा असल्यामुळे कंपनीतील कामगारांमध्ये देखील भीतीचे वातावरण पसरले होते तर कंपनीच्या ज्या भागात गॅसचा साठा तसेच गॅसच्या टाक्या आहेत त्या बाजूला मनुष्यवस्ती आहे त्यामुळे येथील मनुष्यवस्तीत देखील घाबरत पसरली होती, यावेळी सुदैवाने आग लवकरच आटोक्यात आल्यामुळे परिसरातील नागरिकांसह कामगारांनी सुटकेचा निश्वास टाकला.घटना घडल्यानंतर पोलीस सदर कंपनीमध्ये जाऊन आले; परंतु कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.