गोंदवले – गोंदवले बुद्रुक येथे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज समाधी मंदिरात दर्शनासाठी भाविक रांगेत उभे असतानाच, अवघ्या काही फुटांवर असलेल्या वीजवाहक तारेने अचानक पेट घेतला. या आगीमुळे भाविकांची घाबरगुंडी उडाली. ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला खरा; परंतु महामार्गाचे ठेकेदार व महावितरण कंपनीच्या अडमुठेपणामुळे लोकांच्या जीवितास धोका असल्याचा आरोप होत आहे.
गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथे महामार्गाचे काम सुरू आहे. यात रस्त्यालगत नवे विजेचे खांब व तारा टाकण्यात आल्या आहेत. हे काम ठेकेदार व महावितरणने मनमानीपणे केले आहे. श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिराच्या संरक्षक भिंतीला लागून उभारलेल्या खांबांवर हलक्या प्रतीच्या वीजवाहक तारा टाकण्यात आल्या आहेत. येथे भाविकांची संख्या मोठी असल्याने दर्जेदार तारा टाकण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती; परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
समाधी मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी काल (दि. 24) संध्याकाळी सातच्या सुमारास रांगा लावल्या असताना, संरक्षण भिंतीवरून गेलेल्या वीजवाहक तारेने अचानक पेट घेतला. शॉर्टसर्किटमुळे झालेल्या मोठ्या आवाजाने रस्त्यावरील लोकांनी मंदिराच्या दिशेने धाव घेतली. अगदी काही फुटांवर आगीचे लोट उठल्याने भाविक घाबरून पळाले. काही ग्रामस्थांनी विद्युत जनित्राच्या फ्यूज काढल्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले. घटनेनंतर तब्बल अठरा तासानंतर संबंधित ठेकेदार व वीज कंपनीचे अधिकारी तेथे पोहोचल्याने संताप व्यक्त होत आहे.