नवी मुंबई – पनवेलजवळील तळोजा औद्योगिक वसाहतीमधील औद्योगिक क्षेत्रात भूखंड क्रमांक जे 39 वर असलेल्या मोदी केमिकल या रसायनांवर प्रक्रिया करणा-या कारखान्याला भीषण आग लागली आहे. या आगीत अग्निशमन दलाच्या एका जवानाचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आणखी काही जवानांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याची माहिती मिळत आहे.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, कारखाना परिसरात पसरलेल्या केमिकलमुळे एका जवानाचा गुदमरून मृत्यू झाल्याचे समजते. हा अग्निशमन दलाचा जवान अंबरनाथ अग्निशमन दलाच्या पथकात कार्यरत होता, अशी माहिती मिळाली आहे. तसेच जखमी जवानांना जवळच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांमध्ये तळोजा औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन दलाचे प्रमुख दीपक दोरुगडे यांचा देखील समावेश आहे.