रायगड : रायगड जिल्ह्यातील उरण ओएनजीसी गॅस प्रकल्पामध्ये भीषण आग लागली. सकाळी सात वाजेच्या सुमारास लागलेल्या या आगीत तीन कामगार जखमी झाले आहेत. या आगीचा भडका उडताच जेएनपीटी आणि ओएनजीसी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे.
रायगड जिल्ह्यातील उरण शहराजवळ ओएनजीसी गॅस प्रकल्प आहे. मंगळवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास प्रकल्पामध्ये आगीचा भडका उडला. लिक्विड गळतीमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती असून, या आगीत तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. आग लागल्यानंतर जेएनपीटी (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) आणि ओएनजीसीच्या अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवानांकडून प्रयत्न केले जात असून, पावसाचाही अडथळा येत आहे. दरम्यान, प्लॅंटमध्ये काही कामगार अडकले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तर जखमी कामगारांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.