शिरूर : शिरूर तालुक्यातील शिरुर -चौफुला महामार्गारील न्हावरा येथिल घोडगंगा साखर कारखान्याशेजारी असणाऱ्या त्रिमूर्ती कंपनी जवळील विद्युत रोहित्रावर चारचाकी कार धडकून झालेल्या अपघातात रोहित्र खाली कोसळल्याने शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत त्रिमूर्ती प्लास्टिक कंपनी जळून खाक झाली असून यात कंपनीतील मशनरी, कच्चा माल फर्निचर व इतर साहित्य मिळून पाच कोटी पेक्षा जास्त रुपयाचे नुकसान झाले आहे.
याबाबत गुलाब पोपट पडवळ (वय 40 वर्ष, रा. बोरीपार्धी (आनंद हेरीटेज) ता. दौड, जि. पुणे) यांनी खबर दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुलाब पडवळ यांची मालकीची प्लास्टिक कंपनी न्हावरे येथे असून दि.१७ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शिरुर चौफुला महामार्गावर न्हावरा ता.शिरूर घोडगंगा साखर कारखाना शेजारी असणाऱ्या त्रिमूर्ती कंपनी जवळील विद्युत रोहित्रावर चारचाकी हुंडाई कंपनीची कार क्रमांक एम. एच. 12 यु.एस. 1994 कंपनी बाहेर असलेल्या विद्युत रोहित्राला धडकली. यामुळे रोहित्र खाली पडले व शॉर्टसर्किट झाले.
यामुळे शेजारील त्रिमूर्ती प्लास्टीक कंपनीतही शॉर्टसर्किट झाले व आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण करून मोठ्या प्रमाणात आगीच्या ज्वाला व धूर निघू लागला पाहता पाहता संपूर्ण कंपनी आगीच्या भक्षस्थानी पडली. कंपनीचे मालक गुलाब पडवळ व मॅनेजर योगेश आरोटे त्या ठिकाणी आले त्यांनी रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील व शिरूर नगर परिषद अग्निशमन दलाला बोलावले बाजूला असणाऱ्या बांधकामावरील पाण्याचे टँकर बोलवून घेतले.
तब्बल साडेतीन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. परंतु तोपर्यंत कंपनीमधील पाच कोटी पेक्षा जास्त रुपयांच्या मशनरी कच्चामाल जळून खाक झाला. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे जळीताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एन बी जाधव करीत आहे.