कोटा – कोटा विमानतळाच्या संकुलाला सोमवारी रात्री लागलेली आग तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर आटोक्यात आणण्यात आली. आग लागल्यानंतर वाऱ्यामुळे ती वेगाने पसरली. कोटा उत्तर आणि दक्षिण महापालिकांच्या अग्निशामक दलाच्या बंबांनी ही आग नियंत्रणात आणली.
कोटा थर्मल, डीसीएम फॅक्टरी आणि नागरी संरक्षण दलाचे बंबही घटनास्थळावर आले होते.
रात्री साडे अकराच्या सुमारास आगीने पेट घेतला. तेथे असलेल्या गवतामुळे ही आग वेगाने पसरली. अग्नीशामक दलाच्या सात बंबांनी ही आग आटोक्यात आणली. या आगीची तीव्रता येवढी मोठी होती की त्याच्या ज्वाळांनी 12 फुट उंच असणाऱ्या भीती ओलांडल्या होत्या.
या आगीची तीव्रता पाहून पोलिसांनी विमानतळाच्या बाजूलाच असणाऱ्या कोटा झालवर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रोखून धरली होती. वाहनांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला होता.
अग्नीशामक दलाने आग आटोक्यात आणेपर्यंत संपूर्ण संकुलाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. पोलिसांनी अख्ख्या संकुला वेढा देऊन कोणाताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची खबरदारी घेतली होती. या विमानतळावरून अद्याप विमना सेवा सुरू झाली नाही ही त्यातल्या त्यात जमेची बाब होती. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
अग्नीशामक दलाने विमानतळाची भींत आणि जवळ असणारी निवासी संकुले यांच्या मोठे अंतर ठेवण्याची सुचना केली आहे. शेजारच्या इमारतीतून कोणीतरी पेटती सिगरेट अथवा बिडी टाकल्यामुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळेच अनेक प्रतिबंधात्मक उपाय करून संकुलात आग लागण्याच्या घटना ही नित्याची बाब बनली आहे.