मुंबई : मुंबईतील माझगाव येथे असलेल्या जीएसटी भवनाला भीषण आग लागली आहे. इमारतीच्या आठव्या मजल्यावर ही आग लागली आहे. ही भीषण आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे 20 बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. या ठिकाणी आग नियंत्रणात आणण्याचे काम वेगाने सुरु आहे. लेव्हल थ्री ची आग लागल्याचे अग्निशमन दलाने म्हटले आहे. म्हणजेच ही आग गंभीर स्वरुपाची आहे. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी कसोशीचे प्रयत्न सुरु आहेत.
Mumbai: A level III fire has broken out in GST Bhavan, in Mazgaon area. More details awaited. pic.twitter.com/92fqpMF3tt
— ANI (@ANI) February 17, 2020
ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली ते अद्याप समजू शकलेले नाही. ही आग लागल्याचे समजताच उपमुख्यमंत्री अजित पवार हे बैठक सोडून घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. वरचे दोन मजले रिकामे होते तिथे नुतनीकरण सुरु होते. त्यामुळे या ठिकाणी कर्मचारी नव्हते. घटनास्थळी धुराचे लोट आणि आगीचे लोळ दिसत आहेत. सातव्या आणि आठव्या मजल्यावर ही भीषण आग लागली आहे. 100 पेक्षा जास्त कर्मचारी हे आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आणि त्यानंतर आगीने रौद्ररुप धारण केले आहे. ही आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.