बीजिंग – चीनमधील निवासी मार्शल आर्टस् स्कुलला शुक्रवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. त्यामध्ये होरपळून 18 विद्यार्थी मृत्युमुखी पडले. त्याशिवाय, 16 विद्यार्थी जखमी झाले.
हेनान प्रांतात असणाऱ्या संबंधित स्कुलमध्ये 7 ते 16 वर्षे वयोगटातील 34 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. ते विद्यार्थी स्कुलच्या पहिल्या मजल्यावर झोपले असताना अचानकपणे आग लागली. काही क्षणांतच त्या आगीने संपूर्ण मजल्याला घेरले.
आगीचा दाह सहन न झाल्याने विद्यार्थ्यांनी आक्रोश सुरू केला. त्यांना वाचवण्यासाठी काही जण धावले. पाण्याचे फवारे मारून त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही.
आगीच्या दुर्घटनेनंतर स्थानिक सुरक्षा आणि तपास यंत्रणेने स्कुलचालकाला अटक केली. आगीचे कारण तातडीने समजू शकले नाही. चीनमध्ये अवघ्या पंधरवड्यात घडलेली आगीची ही दुसरी भीषण दुर्घटना आहे. याआधी हुबेई प्रांतात 13 जूनला वायूगळतीमुळे स्फोट होऊन लागलेल्या आगीत 12 जण मृत्युमुखी पडले होते.