नवी दिल्ली – दिल्ली परिवहन विभागाच्या सिव्हील लाईन्स मेट्रो स्टेशन जवळील कार्यालयाला आज मोठी आग लागली. त्यात महत्वाच्या कागदपत्रांसह अन्य मालमत्तेचही मोठी हानी झाली आहे. तथापी यात सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमाराला आगीची माहिती देणारा फोन आल्यानंतर अग्निमशन दलाचे आठ बंब तिकडे पाठवण्यात आले. कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील सर्व्हर रूममधून ही आग पसरली. त्यानंतर ती आठ अन्य खोल्यांमध्ये पसरली.
अन्य मजल्यावरही ती पसरत असल्याचे लक्षात येताच अग्मिशमन दलाचे जादा बंब तिकडे तैनात करण्यात आले. एकूण 26 बंब ही आग विझवण्याचे काम करीत होते. साडे दहा वाजण्याच्या सुमराला ही आग आटोक्यात आली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही तथापी सकृती दर्शनी शॉर्ट सर्किटमुळेच हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येते.