कदमवाकवस्ती येथील घटना : डिलर ऍग्रीमेंटमध्ये पावणेनऊ कोटींची फसवणूक
लोणी काळभोर – डिलर ऍग्रीमेंटमध्ये काहीही उल्लेख नसताना फिर्यादी व इतर भागीदारांवर दबाव टाकून वेळोवेळी 9 कोटी 98 लाख 41 हजार 834 रूपयांचा अपहार करून फसवणूक केल्याबद्दल न्यू हॉलंड ट्रॅक्टर कंपनीसह पदाधिकाऱ्यांविरोधांत गुन्हा दाखल केला आहे. ही फसवणूक दि. 23 डिसेंबर 2013 ते 16 मे 2018 या कालावधीत झाली आहे. याप्रकरणी रमेश खैरे (रा. कदमवाकवस्ती) यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी सीएनएच. इंडस्ट्रीयल इंडिया प्रा. लि. ऊर्फ न्यू हॉलंड फियाट (इंडिया) प्रा. ली. मुख्य कार्यालय- (नवी दिल्ली) कंपनीसमवेत संचालक स्टिफनो पम्पलोणी, दमीअनो क्रेतारोला, रौनक वर्मा, नरींदर मित्तल, सचिन बिष्नोई, डेव्हिड बेक्कारीया, विवेक जैन, विमल वि. कुमार (सर्व रा. जसोला डिस्ट्रीक सेंटर, नवी दिल्ली) व व्यवस्थापक नितीन नरेशचंद जैन (रा. गुरगाव, दिल्ली) गणेश माणिकराव निंबोरे, ललित जैन, सुशिल पटेल, अमोल कापसे रा. हडपसर, पुणे) या चौदा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
दि, 4 डिसेंबर 2012 रोजी सूर्या ट्रॅक्टर्स कंपनी (कदमवाकवस्ती, ता. हवेली) या भागीदारी संस्थेस न्यू हॉलंड कंपनीचे ट्रॅक्टर्स व संबंधीत उपकरणे विक्री व दुरूस्तीची डिलरशीप मिळाली. सूर्या कंपनीने कंपनीशी करारनामा केला होता. त्यावेळी कंपनीने डिलर अँग्रीमेंटमध्ये काहीही उल्लेख नसतानाही सूर्याकडून 2013 व 2014 मध्ये एकूण 5 कोटीची बॅंक गॅरंटी घेतली. अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना बॅंक गॅरंटी, बॅंक ऑफ बडोदा शाखा थेऊर फाटा येथून रकमा काढून दिल्या. दि. 12 नोव्हेंबर 2012 मध्ये खैरे यांनी सूर्या कंपनीत नवीन भागीदार म्हणून प्रवेश केला होता.
ते भागीदार होण्यापूर्वी, बाळासाहेब दत्तात्रय भोसले (कोतवाल) हे भागीदार संस्थेचे कामकाज पाहत होते. त्यानंतर दि. 9 मे 2015 रोजी काही भागीदार निवृत्त झाले. त्यावेळी सूर्या कंपनी न्यू हॉलंडला व्यवहारापोटी काही रक्कम देय होती. त्यामुळे न्यू हॉलंड व तीचे तत्कालीन संचालक, अधिकाऱ्यांनी देय रक्कम अदा करण्याची जबाबदारी निवृत्त होणाऱ्या भागीदारांवर, कायम राहणाऱ्या भागीदारांवर तसेच नवीन समाविष्ट होणाऱ्या भागीदारांवर संयुक्तीकरित्या देय रक्कम अदा करण्याची जबाबदारी ठेवली. त्यासाठी आरोपी कंपनीने सूर्या कंपनीचे सर्व भागीदारांना त्रिपक्षीय करार करण्यास भाग पाडले. फिर्यादी तसेच आशा रमेश खैरे यांनी संजय ट्रॅक्टर्स ऍन्ड ऍटोमोबाईलस् ही भागीदारी संस्था स्थापन केली.
त्याबाबत न्यु हॉलंड कंपनीला कळवले होते. त्रिपक्षीय करारनाम्यानुसार सूर्या कंपनीची सर्व थकबाकी न्यू हॉलंडला व्यवसायाच्या उत्पन्नामधून अदा केली होती. त्यामुळे न्यू हॉलंडने सूर्या व तीचे भागीदारांची जबाबदारी संपल्याने त्यांनी दिलेल्या सर्व बॅंक गॅरंटीमधून मुक्त करणे गरजेचे होते. परंतू निवृत्त, कायम व नवीन समाविष्ट झालेले भागीदार, संजय ट्रॅक्टर्स ऍन्ड ऑटोमोबाईल्स भागीदारी संस्थेचे भागीदार यांना नवीन त्रिपक्षीय करारनामा करण्यास भाग पाडले. यानंतरही दि. 16 मे 2018 पर्यंत अमिषे दाखवून फसवणूक केली.
आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सूर्याचे भागीदार रमेश खैरे यांनी शिवाजीनगर पुणे येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे दावा दाखल केला. कोर्टाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिल्यानंतर न्यू हॉलंड कंपनी व पदाधिकारी यांच्याविरोधांत आर्थिक अपहार करून व्यापारी फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.