अशोकनगर, (मध्यप्रदेश): लोकसभा निवडणूकीमध्ये कॉंग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंदीया यंचा पराभव करणारे भाजपचे खासदार के.पी. यादव आणि त्यांच्या मुलाच्या विरोधात चुकीची माहिती दिल्याबद्दल “एफआयआर’ नोंदवण्यात आला आहे. “नॉन क्रिमी लेअर ओबीसी’ प्रमाणपत्र मिळवण्यासाठी यादव यांनी चुकीची माहिती दिल्याचे निष्पन्न झाले आहे, असे पोलिसांनी सोमवारी सांगितले. या संदर्भात शनिवारी रात्री कोतवली पोलीस ठाण्यामध्ये फसवणुक, गुन्हेगारी कारस्थान, शपथेवर सरकारी अधिकाऱ्यांना चुकीचे निवेदन देणे आणि खोटी माहिती देणे या गुन्ह्यांसाठीच्या कलमांखाली “एफआयआर’नोंदवण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी ही माहिती दिली.
मुंगावली उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशी अहवालच्या आधारे ही “एफआयआर’ नोंदवण्यात आली, असे अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुनील शिवहारे यांनी सांगितले. यादव यांच्या विरोधात स्थानिक नागरिकाने तक्रार दाखल केल्यावर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी यासंदर्भात चौकशी केली होती.
इतर मागासवर्गीय जातीतील व्यक्तीला “नॉन क्रिमी लेअर’चे प्रमाणपत्र मिळण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा 2017 पर्यंत 6 लाख रुपये इतकी होती. ही मर्यादा नंतर 8 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली. 2014 मध्ये यादव यांनी हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना चुकीची माहिती दिली होती, असे उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.