पुणे – मोटारीच्या इंजिनमधून ऑईल गळती होऊनही पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले याने जागतिक रॅली मालिकेतील (डब्ल्यूआरसी) फिनलॅंड रॅली पूर्ण केली. सर्वाधिक खडतर आणि आव्हानात्मक अशी ही रॅली समजली जाते. गतवर्षीही त्याने ही रॅली पूर्ण केली होती.
संजयसमवेत इंग्लंडचा डॅरेन गॅरॉड याने दिशादर्शकाचे काम केले. संजयने आर4 गटात 18 जणांत 14वे, तर एकूण क्रमवारीत 49 जणांत 40वे स्थान मिळविले. रॅलीत सहभागी झालेला तो एकमेव भारतीय स्पर्धक होता. 12 स्पर्धकांना तांत्रिक बिघाड किंवा छोट्या अपघातांमुळे रॅली पूर्ण करता आली नाही. संजयने तांत्रिक बिघाडांचा परिणाम रॅली पूर्ण करण्यावर होऊ दिला नाही,मात्र सावधगतीने मोटार चालविताना क्रमवारीत चांगले स्थान मिळविण्याच्या त्याच्या प्रयत्नांना यश आले नाही.
संजयने सांगितले की, यंदा रॅली पूर्ण करण्याचे प्राथमिक उद्दीष्ट साध्य करून गतवर्षीचा क्रमांक कायम राखलो याचे समाधान आहे. गतवर्षीपेक्षा वेगाचे सातत्य जास्त होते. त्यामुळे भविष्यासाठी चांगली तयारी करता येईल.
तीन दिवसांच्या या रॅलीत 23 टप्प्यांचा समावेश होता. संजय-गॅरॉड यांनी रॅलीचे 307.58 किलोमीटर तीन तास 41 मिनिटे 50.3 सेकंद पेनल्टी वेळेसह पूर्ण केले.
रॅलीतील पहिल्याच दिवशी त्याच्या मोटारीच्या इंजिनमधून ऑईलची गळती सुरु झाली. यानंतरही संजयने निर्धारीत वेळेत हा टप्पा पार केला. दुसऱ्या दिवशी त्यांना सर्व्हिसिंगसाठी केवळ 15 मिनिटे मिळाली. त्यात हिटींग सेन्सर बदलून संजयने रॅली सुरु केली. पहिल्या दोन स्टेज वेग समाधानकारक होता. पहिल्या सर्व्हिस ब्रेकच्या वेळी सर्व्हिस पार्कमधून बाहेर येण्यास दोन मिनिटे उशीर झाल्यामुळे त्याला 20 सेकंदांची पेनल्टी बसली. 40 मिनिटांच्या सर्व्हिसमध्ये त्याची मोटार पुरेशी नीट झाली नाही. त्याचा ब्रेकवर परिणाम झाला होता. वीशबोन आणि एक लोअर आर्म मोडल्यामुळे संजयला कॉर्नरवर सफाईने वेग राखण्यास आणि थोडा नंतर ब्रेक दाबण्यास अडथळा येत होता. अशातही सकाळी सात वाजता सुरु होऊन रात्री दहा वाजता संपलेला हा टप्पा त्याने पूर्ण केला.
दुसऱ्या दिवशी इंजिन गास्केटला क्रॅक होऊन ते गरम झाले. प्रत्येक टप्प्यानंतर बॉनेट उघडून त्यात पाणी टाकत संजय-गॅरॉड यांनी रॅली सुरु ठेवली. नियमानुसार इंजिन बदलण्याची परवानगी नसते. स्पर्धकांना 22 टायर्स आणि एक इंजिन इतकेच मिळते. वरच्या गिअरमध्ये नियंत्रीत ड्रायव्हिंग करीत त्याने आठ स्टेजेस पूर्ण केल्या. 40 मिनिटांच्या दोन सर्व्हिसमध्ये त्यांना तांत्रिक बिघाड पूर्णपणे दुरुस्त करता आला नाही. त्याने 14 व्या क्रमांकापर्यंत प्रगती केली.