नागरिकांच्या काळजीपोटी सरकारचा निर्णय
फिनलँड – आठवड्यातील ६ दिवस रोज ८ ते १० तास काम केल्यानंतर येणारा सर्वांच्या आवडीचा दिवस म्हणजे रविवार! आपल्या देशात बहुतांश लोकांना मिळणारी एकमेव साप्ताहिक सुट्टी ही रविवार असल्याने या दिवशी आठवडाभर काम करून आलेली मरगळ दूर करण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र घरातील किरकोळ कामं, गाठीभेटी, अशा एक ना अनेक गोष्टींचा ताण बिचाऱ्या एकट्या ‘संडे’वरच असल्यानं तो कधी येतो आणि कधी जातो याचं गणितंच जुळत नाही. ‘अजून एक दिवस सुट्टी असायला हवी होती’ अशी खंत रविवारच्या रात्री मनात येऊन जातेच.
मात्र जर तुम्हाला कुणी सांगितलं की, तुमच्या कामाचे दिवस कमी केले गेले असून आता तुम्हाला आठवड्यात केवळ ४चं दिवस काम करावं लागणार आहे आणि ते देखील दिवसातून केवळ ६ तास! विश्वास बसणार नाही ना? मात्र ही स्वप्नवत वाटणारी संकल्पना जगातील सर्वाधिक तरुण पंतप्रधान असलेल्या सना मरीन यांनी सत्यात उतरवून दाखवली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिनलँडच्या पंतप्रधान सना मरीन यांनी देशातील नागरिकांना आपल्या कुटुंबिय व मित्र-मैत्रिणींना अधिकाधिक वेळ देता यावा यासाठी हा अनोखा निर्णय घेतला असून यापुढे फिनलँडमधील कर्मचाऱ्यांना आठवड्यातून केवळ ४ दिवस दररोज ६ तास काम करावं लागणार आहे.
आपल्या निर्णयाबाबत बोलताना सना मरीन म्हणतात, “कुटुंब व प्रियजनांसोबत टाइम स्पेंड करणं हे सर्वांसाठीच महत्वाचं आहे, आपले छंद जोपासणे, आपल्या संस्कृतीचे विविध पैलू जाणून घेण्यासाठीही वेळ द्यायला हवा. या सर्वांसाठी नवीन कार्यपद्धतीचा अवलंब करणं पहिली पायरी ठरेल.”
मायक्रोसॉफ्ट कंपनीने जपानमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यामध्ये ३ दिवसांची सुट्टी देण्याचा निर्णय लागू केल्यानंतर कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता ३९.९% वाढल्याचं निदर्शनास आलं होत. यानंतर जगभरातील अनेक पुढारलेले देश आठवड्यातील कामाचे दिवस घटवण्याचा निर्णय घेत असून आता यामध्ये फिनलँडचा देखील समावेश झाला आहे.