इंदोरी – इंदोरी (ता. मावळ) येथील इंद्रायणी नदी पात्रावरील ब्रिटिश कालीन पुलावरून नदीपात्रात उडी घेत 23 वर्षीय तरुणाने जीवन संपविले. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने सुसाइड नोट लिहिली. त्यानंतर ती फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर अपलोड करीत स्वत:चा जीवनप्रवास संपविला. रविवारी (दि. 22) सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. प्रेमभंगातून त्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
समीर एकनाथ भसे (वय 23, रा. सांगुर्डी, ता. मावळ) असे तरुणाचे नाव आहे. इंदोरी येथे समीर भसे याने दुचाकी उभी केली. दुचाकीवर देखील आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोट ठेवली. त्यानंतर इंद्रायणी नदीमध्ये उडी घेतली. त्यावेळी स्थानिक मच्छीमारांनी भसे याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले; परंतु त्यांना यश आले नाही. तरुणाने प्रेमभंगातून हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.