राजकीय पक्षांची हाताची घडी तोंडावर बोट

नवनाथ पाटील

शिराळा  – राज्यभरात कडकनाथ कोंबडी प्रकरण गाजत आहे. 700 कोटी रूपयांहून अधिक रकमेचा हा घोटाळा सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. यात फसवणूक झालेले शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून न्यायासाठी आक्रोश करत आहेत. या शेतकऱ्यांचा आवाज आणि दयनीय अवस्था सरकारला – प्रशासनाला दिसतच नाही यात नवल अस काहीच नाही…. पण राज्यातील इतर राजकीय पक्ष संघटनांनी डोळ्यावर पट्टी बांधलेल्या गांधारीची भूमिका घेतली आहे की काय? असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

ज्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे ते कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या गावातील सोसायटी, ग्रामपंचायतींमध्ये सक्रीय पदाधिकारी आहेत. तर अनेकजण राजकीय पक्षांचे पदाधिकारी, बुथ कमिटीवर काम करणारे युवक पदाधिकारी आहेत. सर्वात शेवटी ते मतदार शेतकरी आहेत. एवढं सगळ असतानाही या सर्वांनीच कडकनाथ प्रश्‍नी फसगत झालेल्या शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक वाऱ्यावर सोडले आहे. राजकीय पक्षांचे कट्टर समर्थक म्हणून हेच शेतकरी खांद्यावर झेंडे घेऊन आपल्या नेत्यांच्या प्रचारात आघाडीवर असतात. आमचे नेते…आमचे दैवत…, आमचं काळीज…, आमचे… अमुक, आमचे तमुक म्हणून आपला नेता निवडणारे हेच शेतकरी आज हतबल होऊन निराशेच्या खाईत आयुष्याचा संघर्ष करत आहेत. या शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर लोकप्रतिनिधी मात्र चकारशब्द बोलायला तयार नाहीत. हे चित्र निश्‍चितच शेतकऱ्यांना आत्मचिंतन करायला लावणारे आहे.

संपूर्ण राज्यातून यात्रा काढणाऱ्या महाराष्ट्राचे राजकारण हाताळणाऱ्या कारभाऱ्यांना कडकनाथ कोंबडी प्रकरणी शेतकऱ्यांची झालेली फसवणूक दिसत नाही हे मात्र विशेष. एकेकाळी महाराष्ट्राचे अर्थमंत्री, गृहमंत्री, ग्रामविकास मंत्री पद भूषविणाऱ्या आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या आ. जयंत पाटील यांचा बालेकिल्ला असणाऱ्या इस्लामपूर शहरात या महाघोटाळ्याचा केंद्रबिंदू आहे ही बाब नजरअंदाज करण्यासारखी नाही. शेतकऱ्यांचे सुरू असलेले हाल जयंत पाटील यांना दिसत नाही का असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थत होत आहे.

शिवाय शिराळा विधानसभा मतदार संघातून लोकप्रतिनिधीत्व करणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांना कडकनाथ कोंबडी प्रकरणात अडचणीत सापडलेले शेतकरी दिसत नाहीत का? आणखी एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे भाजप शिवसेनेच्या सरकारची पाठराखण करणारे, नेतेमंडळींना समर्थन करणारे, स्थानिक पातळीवर सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या शेतकऱ्यांनी देखील स्वत:च्या अंगावर कर्जाचा डोंगर उभा करून महारयतच्या कडकनाथमध्ये पैसा गुंतवला आहे. त्या शेतकऱ्यांना देखील सत्ताधाऱ्यांनी वाऱ्यावर सोडले आहे, ही बाब अधोरेखित करण्यासारखी आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

Leave A Reply

Your email address will not be published.