पालिका अतिरिक्त आयुक्तांनाच माहिती नाही
पुणे – शहरातील भरमसाठ होर्डिंग्जची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि भाजपनी लावलेल्या होर्डिंग्जबाबत त्यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्याही दिल्या. असे असताना किती होर्डिंग्जवर कारवाई झाली, याची माहिती अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल यांनाच नाही, असा प्रकार सोमवारी महापालिकेत पत्रकार परिषदेत घडला. “याची माहिती घेऊन सायंकाळी ती देतो,’ असे उत्तर गोयल यांनी दिले.
अनधिकृत फ्लेक्स, होर्डिंग्ज उभारून शहराचे विद्रुपीकरण केले जात असल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने अनेकदा फटकारूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. एवढेच नव्हे, तर यावरील याचिकाही सुनावणीसाठी आली आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी स्वत: लेखी खुलासा देऊन दिलगिरीही व्यक्त केली आहे. असे असताना स्वच्छ शहर स्पर्धेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करणारी महापालिका विद्रुपीकरण करणाऱ्या बॅनरबाजांकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यावर अनधिकृत फ्लेक्स, बॅनर काढण्यासाठी मनुष्यबळ खर्च केले जाते परंतु ते परवानगीशिवाय लावूच नयेत, यासाठी मात्र प्रशासनाकडून काहीच जरब वापरली जात नसल्याचा आरोपही होत आहे.
शहरात नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या जनादेश यात्रेसाठी भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी आणि इच्छुकांनी यात्रेच्या मार्गावर हजारो बॅनर, फ्लेक्स लावले होते. यापैकी मान्यताप्राप्त होर्डिंग्ज वगळता सर्वच बॅनर अनधिकृत होते. शनिवारी यात्रेच्यावेळी तर कोथरूड येथे एका आमदाराने रस्त्यातच लावलेल्या फ्लेक्समुळे रुग्णवाहिकाच अडकून पडली होती. या बॅनरबाजीबद्दल सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली आहे.