पुणे – ऑनलाइन पद्धतीने मागवलेल्या एखाद्या वस्तूची ऑर्डर रद्द करण्यासाठी गुगलवरून कस्टमर केअरचा नंबर घेतल्यास आर्थिक गंडा बसल्याच्या अनेक घटना घडत आहेत. यामुळे बड्या कंपन्यांच्या फेक वेबसाईट असण्याची शक्यता सायबर पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. कस्टमर केअरला कॉल केल्यानंतर पैसे रिफंड मिळण्यासाठी ओटीपी पाठवला जातो. हा ओटीपी शेअर केल्यावर पैसे रिफंड मिळण्याऐवजी बॅंक खात्यातील पैसे काढून घेतल्याचे प्रकार घडत आहेत. अशाच एका प्रकारात विमानाची तिकिटे रद्द करण्यासाठी गुगलवरून कस्टमर केअरच्या नंबरवर संपर्क साधलेल्या व्यक्तीस 43 हजाराचा गंडा घालण्यात आला.
याप्रकरणी 36 वर्षीय व्यक्तीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अज्ञात मोबाइल धारकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीने क्लिअर ट्रीपद्वारे परदेशात जाण्यासाठी तिकिटे खरेदी केली होती. काही कारणामुळे त्यांचा प्रवास रद्द झाल्याने त्यांनी बुकिंग केलेल्या तिकिटाचे पैसे मिळवण्यासाठी क्लिअर ट्रीपचा कस्टमर केअर नंबर गुगलवरून मिळवला. त्यांनी संबंधित नंबरवर कॉल केल्यावर समोरील व्यक्तीने त्यांच्याकडून यूपीआय नंबर घेतला.
फिर्यादी यांचे यूपीआय पेमेंट प्रणालीशी असलेल्या मोबाइलवरून सांकेतीक मेसेज पाठवण्यात आला. हा मेसेज पुन्हा फॉरवर्ड करण्यास सांगून, त्यानंतर ओटीपी नंबर शेअर करण्यास सांगितले. यानंतर पैसे रिफंड होण्याऐवजी 42,999 रुपये ऑनलाइन पद्धतीने काढून घेण्यात आले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक ए. बी. वाघमारे करत आहेत.