करोनाचे जन्मस्थळ लवकरच सापडणार? – बायडेन यांचे अमेरिकन गुप्तचर यंत्रणेला ‘महत्वपूर्ण’ आदेश

वॉशिंग्टन – करोनाचा जगाला विळखा घालणारा विषाणू नेमका तयार झाला कुठे हे कोडे संपूर्ण जगाला अद्याप सुटलेले नाही. चीनकडे जरी बोट दाखवले जात असले तरी ठोस हाती काही लागलेले नाही. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनेही मिठाची गुळणी धरली आहे.

मात्र, जोपर्यंत त्याचे उत्पत्ती स्थळ सापडत नाही, तोपर्यंत त्याचा कायमचा बंदोबस्त करणारे औषधही सापडणार नाही, अशी धारणा आता प्रबळ होऊ लागली आहे. त्याचे कारण करोनाच्या विषाणूत होत असलेले बदल.

या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी बुधवारी त्यांच्या देशातील गुप्तचर यंत्रणांना कोविडचे जन्मस्थळ शोधण्यासाठीचे प्रयत्न वाढवा, असे आदेश दिले आहेत. नव्वद दिवसांत कोविड कुठून आला याचा काय तो छडा लावा, असे आदेश गुप्तचर यंत्रणांना देतानाच बायडेन यांनी अमेरिकी प्रयोगशाळांनी या संदर्भात गुप्तचर यंत्रणांना मदत करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

प्राण्याच्या माध्यमातून करोनाचे माणसात संक्रमण झाले की, चीनमधील प्रयोगशाळेतून अपघाताने या विषाणूची साथ पसरली याचा परत खोल तपास घेतला जावा, अशा सूचना देतानाच बायडेन यांनी चीनने या आंतरराष्ट्रीय तपासात सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने कोविड विषाणू चीनच्या प्रयोगशाळेतून लीक झाला नसल्याचा खुलासा यापूर्वी केला होता. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेचे निष्कर्ष पुन्हा तपासून पाहिले गेले पाहिजेत, असे बायडेन यांनी म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने चीनमधील प्रयोगशाळेला भेट देऊन गोळा केलेल्या डेटामध्ये जनावरे तपासणी डेटाकडे दुर्लक्ष केले होते, असे म्हटले जात आहे. या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने अहवाल सादर केला आहे.

मात्र, त्यात अनेक त्रुटी असल्याचे म्हटले जात आहे. वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या गुप्तचर अहवालात हा विषाणू जगात पसरण्याच्या आधी वुहान प्रयोगशाळेत काम करणारे तीन चिनी संशोधक आजारी पडले होते आणि त्यांनी हॉस्पिटल सेवांची मागणी केली होती असे म्हटले गेले आहे.

दोनच दिवसांपूर्वी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि तेथील एका आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञानेही या प्रकरणाचा पूर्ण तपास झाला पाहिजे, अशी मागणी एका मुलाखतीत केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.