तंत्रज्ञ, नवउद्यमी, माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना “टास्क’
पुणे – व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत असलेले “झूम’ हे संकेतस्थळ सुरक्षित नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट आहे. त्यानंतर “डिजिटल इंडिया’अंतर्गत देशातच नवा पर्याय विकसित करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार स्तरावर सुरू करण्यात आला आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने देशभरातील तंत्रज्ञ, नवउद्यमी, माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना “झूम’ या संकेतस्थळाला पर्याय विकसित करण्याचे आव्हान दिले आहे. त्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, विजेत्याला एक कोटीचे पारितोषिक दिले जाणार आहे.
करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू झाल्यानंतर देशभरातील नोकरदार घरी राहून काम करत आहेत. त्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी “झूम’ या संकेतस्थळाचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. मात्र, हे संकेतस्थळ सुरक्षित नसल्याचे केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे देशातच या संकेतस्थळाचा पर्याय शोधणे सुरू करण्यात आले आहे.
स्पर्धा नोंदणीसाठी दि.30 एप्रिलची मुदत
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी संकेतस्थळ विकसित करण्याची स्पर्धा संकल्पना, प्रारूप आणि निर्मिती अशा तीन टप्प्यात होणार आहे. या स्पर्धेसाठीची नोंदणी सुरू झाली असून, त्यासाठी 30 एप्रिल ही अंतिम मुदत आहे. स्पर्धेची सविस्तर माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे.