लोणंद (प्रतिनिधी) –डॉ. मकरंद डोंबाळे, डॉ. उमेश साळुंखे यांच्या लोणंद येथील स्वामी समर्थ हॉस्पिटलने करोनाच्या लढाईसाठी आर्थिक मदतीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला.
बारामतीमध्ये असलेल्या करोना तपासणी केंद्रामुळे परिसरातील व तालुक्यातील रुग्णांना दिलासा मिळाला आहे. दररोज वीस-पंचवीस रुग्णांची तपासणी होऊन संध्याकाळपर्यंत निकाल मिळत आहेत. यासाठी डॉ. डोंबाळे व डॉ. साळुंखे यांनी करोना योद्ध्यांच्या वतीने श्री, पवार यांचे आभार मानले. दरवर्षी जुलैमध्ये येणारा पवार यांचा वाढदिवस स्वामी समर्थ हॉस्पिटल संस्थेने आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, फळवाटप आदी उपक्रमाने साजरा केला आहे.
करोनामुळे गर्दी टाळणे गरजेचे असल्याने इतर खर्चाला फाटा देऊन अतिनील किरण तत्वावर चालणारे मशीन अजित पवार यांच्या वाढदिवसाची भेट म्हणून देण्यात आले. अजित पवारांनी हॉस्पिटलच्या विविध उपक्रमाची माहिती घेऊन डॉक्टरांनी काळजी घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, माळेगाव साखर कारखान्याचे संचालक तानाजीराव देवकाते, बारामती दूध संघाचे माजी चेअरमन विठ्ठलराव देवकाते, ऋषिकेश देवकाते, नवनाथ साळुंखे, नितीन तोरवे आदी उपस्थित होते.
मशीनची भेट पाहून पवारही सुखावले
सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांमुळे जंतूंची वाढ होत नाही या तत्वावर अतिनील किरण मशीन तयार करून यामध्ये दैनंदिन वापरण्याच्या विविध वस्तू उदाहरणार्थ पैसे, पाकीट, फाईल, मोबाईल इत्यादी निर्जंतुक होऊ शकतात. आपल्या लोकनेत्याचा वाढदिवस चिरकाल स्मरणात राहण्यासाठी या मशीनची भेट पाहून अजित पवारही सुखावले. या प्रकारच्या मशीन पुणे, मुंबईच्या आपल्या कार्यालयासाठीही वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले.