नवी दिल्ली : केंद्र सरकारने करोनाबाधितांच्या प्रमाणानुसार राज्यांना आर्थिक पॅकेज द्यावे. त्यामुळे करोना संकटावर पूर्ण मात करणे शक्य होईल, अशी भूमिका राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांनी बुधवारी मांडली. लॉकडाऊन उठवावे की नाही याबाबतचा निर्णय राज्यांबरोबरच वैद्यकीय तज्ञ आणि शास्त्रज्ञांशी सल्लामसलत करूनच घेतला जावा. लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय झाल्यास त्याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने व्हावी, असे पायलट पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.
राजस्थानने वेगवान हालचाली केल्या. केवळ शहरी जनतेपर्यंतच नव्हे; तर ग्रामस्थांपर्यंत आम्ही पोहचलो. त्यामुळे करोनाचा फैलाव मर्यादित प्रमाणात का होईना पण रोखण्यात राजस्थानला यश आले. ग्रामीण भागांतही आम्ही निर्जंतुकीकरण केले, अशी माहिती त्यांनी दिली. करोनावर मात करण्यासाठी राज्यांना आर्थिक मदत मिळण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. करोना फैलाव आणि लॉकडाऊनमुळे आर्थिक हालचाली ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक राज्याला आर्थिक पॅकेज मिळायला हवे, असे त्यांनी म्हटले.