पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून बाहेरगावाहून शहरात राहण्यासाठी आलेले विद्यार्थी व इतरांची गावी जाण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. मात्र, याचा गैरफायदा घेत खासगी वाहनचालकांनी भरमसाठ तिकिट दर वाढवित प्रवाशांची आर्थिक लुट करण्यास सुरुवात केली आहे.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालये व अभ्यासिका बंद केल्या आहेत. यामुळे शहरातून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची अचानक गर्दी वाढल्याचे सध्या दिसून येत आहे. प्रशासनाने एसटी बसेस, रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या कमी केल्याने प्रवाशांनी खासगी वाहनांनी जाण्यास पसंती देत आहेत. याचा गैरफायदा घेत खासगी वाहनचालकांनी प्रवाशांची आर्थिक लुट सुरू केल्याचे दिसत आहे.
मराठवाडा, विदर्भातील तिकिट दर दुप्पट
शहरात मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने विद्यार्थी व नोकरदारवर्ग पुण्यात वास्तव्यास आहे. यामधील बहुतांश नागरिक गावी जाण्यासाठी निघाल्याने खासगी ट्रॅव्हल्स व इतर वाहनांनी तिकिट दरात भरमसाठ वाढ केली आहे. प्रामुख्याने मराठवाडा व विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांची तिकिट दरात वाढ करत आर्थिक लुट केली जात आहे.
लातूरला जाण्यासाठी इतर दिवशी 300 ते 500 रुपयांपर्यंत तिकिट दर असतात. मात्र, लातूरला जाण्यासाठी मला 1200 रुपये तिकिट ट्रॅव्हल्स कंपन्यांनी सांगितले. याचबरोबर, मागील चार दिवसांपासून तिकिट दर वाढल्याचे सांगण्यात आले आहे.
– ऍड. गणेश देशमुख, प्रवासी