पिंपरी – पालिकेकडून दिव्यांगांना प्रधानमंत्री आवास योजना व इतर घरकुल योजनेंतर्गत घर खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेमध्ये गेल्या सात महिन्यांत 47 दिव्यांगांना एक लाख याप्रमाणे 47 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. त्यामुळे दिव्यांगांना त्यांचे हक्काचे घर मिळविण्यासाठी मदत झाली आहे.
महापालिका नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत दिव्यांग, विशेष मुले व व्यक्ती, कुष्ठपीडित व्यक्ती, सामाजिक संस्था आदींना अर्थसहाय्य दिले जाते. अपंग कल्याणकारी योजनेसाठी 27 कोटी 16 लाख रुपयांची वार्षिक आर्थिक तरतूद केलेली आहे. त्यापैकी 1 एप्रिल ते 4 नोव्हेंबर अशा सात महिन्यांच्या कालावधीत 13 कोटी 23 लाख 99 हजार रुपयांचे अर्थसहाय्य वितरित केले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय – अपंग पेन्शन योजनेतंर्गत 7 हजार 642 जणांना 8 कोटी 81 लाख 28 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले. महापालिका हद्दीतील कुष्ठपीडित व्यक्तींना सहामाही आणि वार्षिक अर्थसहाय्य दिले जाते. त्याचा आत्तापर्यंत 288 जणांनी लाभ घेतला. 22 लाख 92 हजार 500 रुपयांची रक्कम त्यासाठी देण्यात आली.
विशेष मुले/व्यक्तींचा सांभाळ करणाऱ्या एकूण 2 हजार 424 जणांना 3 कोटी 70 लाख 99 हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले. सामाजिक कार्य करणाऱ्या सार्वजनिक संस्था, सार्वजनिक ट्रस्ट, विशेष मुले, अंध, कुष्ठरोगी, मुकबधीर यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, वृद्धाश्रम, अनाथालय आदींसाठी अनुदान दिले जाते. या योजनेत एका संस्थेला 2 लाख 99 हजार रुपयांचे अनुदान दिले आहे.