नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची कन्या परकला वांग्मयी यांचा विवाह बंगळुरू येथील वडलोपार्जित घरात अत्यंत साध्या पध्दतीने संपन्न झाला. कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या या विवाह सोहळ्याला कोणीही राजकीय नेता आणि कोणी अतिमहत्वाची व्यक्ती अशा कोणाला आमंत्रित करण्यात आलेले नव्हते. प्रतीक दोषी हे अर्थमंत्र्यांच्या जावयाचे नाव असून ते मुळचे गुजरात येथील आहेत. वैदिक पध्दतीने पूर्ण रिती रिवाजांनुसार हा विवाह सोहळा संपन्न झाला.
मात्र सर्वसामान्यांना आता विशेष कुतुहल आहे ते प्रतिक दोषी यांच्याबाबत जाणून घेण्याचे. विविध माध्यमांनीही आज दोषी यांची माहिती प्रसिध्द केली आहे. त्यानुसार दोषी हे गुजराथी कुटुंबातील असून ते पंतप्रधान कार्यालयात अर्थात पीएमओमध्ये ओएसडी (रिसर्च अँड स्ट्रॅटेजी) म्हणून कार्यरत आहेत. पंतप्रधान कार्यालयात चार ओएसडी आहेत व दोषी त्यापैकी एक आहेत. त्यांना मॅनेजमेंट गुरू असे म्हटले जाते. प्रतिक दोषी हे निवडणूक व्यवस्थापनातील तज्ज्ञ मानले जातात. डाटा एक्स्पर्ट असणारे प्रतिक दोषीच पंतप्रधानांच्या देश विदेशातील दौऱ्यांची रणनीती तयार करतात.
ुपीएमओच्या अधिकृत वेबसाइटवर दोषी यांच्या कामाची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार त्यांचे काम रिसर्च अँड स्ट्रॅटेजी म्हटले असले तरी ते तेवढ्यापुरते मर्यादीत नाही. 2014 मध्ये ते पंतप्रधान कार्यालयात दाखल झाले. मात्र त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासूनचे संबध आहेत. त्यावेळी ते गुजरातच्या मुख्यमंत्री कार्यालयात रिसर्च असिस्टंट होते. मोदी गुजरातमधून दिल्लीला आल्यावर प्रतिकही दिल्लीला आले. 2019 मध्ये मोदी दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाल्यावर दोषी यांना जॉइंट सेक्रेटरी म्हणून प्रमोट अर्थात बढती देण्यात आली. जरी ते ओएसडी असले तरी त्यांचे वास्तविक कामकाज त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक आहे.
दोषी यांनी सिंगापूर मॅनेजमेंट स्कूलमधून एमबीएचे शिक्षण घेतले असून अत्यंत लो प्रोफाइल राहतात. ते सोशल मीडियावर दिसत नाहीत. पीएमओमध्ये त्यांना पंतप्रधान मोदी यांचे डोळे आणि कान मानले जाते. एका प्रख्यात माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार एखाद्या निवडीला अथवा नियुक्तीला मंजुरी देण्यापूर्वी संबंधित फायलीवर पंतप्रधानांना विशेष इनपूट देण्याचे काम प्रतिक यांचेच असते. सरकारमधील नोकरशहा, कुलपती अथवा आयआयटी- आआयएमच्या संचालकांची नियुक्ती असो, प्रतिक दोषीच पंतप्रधानांना फीडबॅक देतात.
दिल्लीच्या वर्तुळातील सगळया टॉपच्या अधिकाऱ्यांची माहिती असणारा माणूस ही त्यांची ओळख आहे. स्वत: प्रकाशझोतात न राहता सगळी माहिती त्यांच्याकडे असते असे दिल्लीच्या सत्तावर्तुळात मानले जाते. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कन्या परकला वांग्मयी या पत्रकार आहेत आणि मिंट या माध्यमात सांस्कृतिक विभागात काम करतात. पूर्वी त्या द हिंदू दैनिकाच्या फिचर विभागात होत्या. त्याही लो प्रोफाइल आयुष्य जगतात. कला- संस्कृती आणि लाइफ स्टाइल विषयावर त्यांनी पुस्तके लिहिली आहेत.