कर्ज स्वस्त होणारच…

व्याजदर कपातीकडे अर्थमंत्र्यांचे वैयक्‍तिक लक्ष

नवी दिल्ली : रिझर्व्ह बॅंकेने ज्या प्रमाणात व्याजदर कपात केली आहे, त्या प्रमाणात ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याजदर कमी करण्याचे आश्‍वासन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उद्योजकांना दिले. यात आपण वैयक्‍तिक लक्ष घालू, असे त्यांनी पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्सच्या सदस्यांना वेबिनारमध्ये सांगितले.

या संदर्भातील माहिती चेंबरने एक ट्‌विट करून दिली आहे. यामध्ये म्हटले आहे की, ग्राहकांवरील कर्जाचा बोजा कमी व्हावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. कमी व्याजदराचा ग्राहकांना शक्‍य तितक्‍या लवकर फायदा व्हावा यासाठी आपण वैयक्‍तिक लक्ष घालून प्रयत्न करणार असल्याचे सीतारामन म्हणाल्या. गेल्या महिन्यात रिझर्व्ह बॅंकेने रेपोदरात 0.40 टक्‍के घट करून तो केवळ 4 टक्‍के केला आहे. बॅंकेचे गव्हर्नर शक्‍तिकांत दास यांनीही पतधोरण जाहीर करताना व्यावसायिक बॅंकांनी कर्जावरील व्याजदर शक्‍य तितक्‍या लवकर कमी करावे, असे सांगितलेले आहे.

फेब्रुवारी 2019 ते 15 मे 2020 या कालावधीत बॅंकांच्या व्याजदरात सर्वसाधारणपणे 0.90 टक्‍क्‍यांची कपात झाली आहे. त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात रेपोदरात कपात झालेली आहे. त्यामुळे रेपोदराच्या प्रमाणात कर्जावरील व्याजदरात कपात व्हावी, अशी मागणी वेळोवेळी ग्राहकांकडून होत असते, ही बाब अर्थमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी हे आश्वासन दिले.

उद्योजकांचा सन्मान करणार…..

उद्योजक भांडवल व नावीन्यपूर्ण संकल्पनाच्या आधारावर समृद्धी निर्मिती करतात. रोजगारनिर्मिती करून अर्थव्यवस्था वाढवितात. त्यांच्या या कामाचा सरकार सन्मान करेल, असे सीतारामन म्हणाल्या. उद्योजकांशी वेळोवेळी चर्चा करून सरकार आवश्‍यक ते धोरण तयार करेल, असे त्यांनी सांगितले.

किमान सरकार आणि कमाल प्रशासन म्हणजे मॅक्‍झिमम गव्हर्नन्स अँड मिनिमम गव्हर्नर्मेंट हे सरकारचे धोरण आहे. उद्योजकांना उद्योग करण्यास स्वातंत्र्य देण्याचा सरकारचा सहा वर्षापासून प्रयत्न आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.